हेलसिंकी, (स्वीडन) – स्वीडनमधील एका अपार्टमेंटमध्ये झालेल्या शक्तिशाली स्फोटात किमान 20 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले. या जखमींपैकी 8 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या स्फोटामुळे या अपार्टमेंटमधील शेकडो जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. या स्फोटामागील नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
अन्नेदाल जिलह्यातील गोटेबोर्ग शहरातल्या या अपार्टमेंटमध्ये हा स्फोट पहाटे 5 च्या सुमारास झाला. या स्फोटामुळे या अपार्टमेंटबरोबरच शेजारच्या अपार्टमेंटमध्येही आग लागली होती. सकाळपर्यंत ही आग विझवण्याचे काम सुरू होते, असे फायर फायटर्सनी सांगितले.
हा स्फोट इतका जबरदस्त होता की त्यामुळे आजूबाजूच्या इमारतीही हादरल्या. या अपार्टमेंटमधील काही रहिवाशांनी भीतीने बाल्कनीतून खाली उड्या मारल्या, असे स्थानिक रहिवाशांनी सांगितले.
हा स्फोट होण्यामागे विविध कारणे सांगितली जात आहेत. गॅस सिलिंडरच्या स्फोटासह अपार्टमेंटच्या मागील प्रवेशद्वारीतून काही स्फोटके नेली गेली असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे. या स्फोटामागे नक्कीच काही नैसर्गिक कारण नसावे, असे पोलिसांनी प्राथमिक तपासातून म्हटले आहे.
गॅंगवॉरचे कारण असल्याचाही संशय
स्वीडनमध्ये अलीकडील काळात सामूहिक टोळी युद्धाची प्रकरणे वाढीस लागली आहेत. 30 जूनला एका पोलीस अधिकाऱ्याची हत्या झाली. त्याप्रकरणी 17 वर्षीय युवकाला अटक करण्यात आली आहे. 2019 मध्ये लिंकोपिंग शहरातील दोन शेजारच्या इमारतींमध्येही अशाच प्रकारे स्फोट झाला होता. त्याच पद्धतीने गॅंगवॉरशी संबंधित घटनांमधूनच गोटेबोर्ग शहरातही स्फोट घडवून आणला गेला असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे.