हरित “टाऊनशीप’द्वारे कार्बन उत्सर्जन घटवणार

पीएमआरडीए आणि वॅट स्मार्ट सिटी संघटना यांचा संकल्प

पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) हद्दीत कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी हरित “टाऊनशीप’ उभारण्यात येणार आहे. यासाठी स्विर्त्झलॅंड येथील 2000 वॅट स्मार्ट सिटी असोसिएशनशी प्राधिकरणाने सामंजस्य करार केला आहे. यानंतर पीएमआरडीए आणि 2000 वॅट स्मार्ट सिटी संघटना मिळून एका कंपनीची स्थापना करणार असून यामाध्यमातून पीएमआरडीए हद्दीत कृषी, सेवा उद्योग समूह, हेल्थकेअर अशा विभागांमध्ये हरित “टाऊनशीप’ उभारली जाणार असून एका “टाऊनशीप’साठी सुमारे 125 एकर जागेची आवश्‍यकता असल्याची माहिती आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.

पीएमआरडीए आणि 2000 वॅट स्मार्ट सिटी संघटना यांच्यासोबत हरित टाऊनशीप संदर्भात गुरुवारी सांमजस्य करार झाला. त्यावेळी विक्रम कुमार बोलत होते. यावेळी स्विर्त्झलॅंडचे कॉन्सिल जनरल ओथमार हारदेगार, संघटनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माधव भागवत, पीएमआरडीएचे मुख्य अभियंता विवेक खरवडकर, प्राधिकरणाच्या अतिरिक्त आयुक्त कविता द्विवेदी आदी उपस्थित होते.

यावेळी स्विर्त्झलॅंडचे कॉन्सिल जनरल ओथमार हारदेगार म्हणाले की, भारत आणि स्विर्त्झलॅंड या दोन्ही देशांत 71 वर्षांचे मैत्रीपूर्ण संबध असून शाश्‍वत विकासासंदर्भात स्विर्त्झलॅंड हा नेहमीच भारताला मदतीसाठी तयार आहे. 2000 वॅट स्मार्ट सिटी असोसिएशनअंतर्गत कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या दृष्टीने भारताने उचललेले हे पाऊल स्वागतार्ह आहे. आमच्याकडे असलेले आधुनिक तंत्रज्ञान, अनुभव या क्षेत्रातील ज्ञान याद्वारे आम्ही पूर्ण सहकार्य करू. यावेळी आयुक्त विक्रम कुमार म्हणाले, “हरित टाऊनशीपसाठी वेगळी बांधकाम नियमावली बनविली जाणार आहे. टाऊनशीप उभारण्यासाठी स्मार्ट सिटी संघटनेने पीएमआरडीएची निवड केली आहे, याचे समाधान आहे.’

100 कोटी डॉलर्स गुंतवणुकीची अपेक्षा
2000 वॅट स्मार्ट सिटी असोसिएशनच्या सहकार्याने पुढील दीड वर्षांत अशा विविध टाऊनशीप प्रकल्पांच्या अंतर्गत सुमारे 100 कोटी अमेरिकन डॉलर इतकी गुंतवणूक होणे अपेक्षित आहे. याबरोबरच स्थानिकांना शाश्‍वत विकासाच्या दृष्टीने कार्बन उत्सर्जन शून्य असणारी स्मार्ट टाऊनशीप देण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्नशील असल्याचे यावेळी भागवत यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.