एसटी बसअभावी विद्यार्थी परीक्षेस मुकले

काले येथे संतप्त विद्यार्थी, प्रवाशांनी रोखल्या बस; पोलिसांच्या मध्यस्थीने निवळला तणाव

कराड – एसटीच्या कराड आगार व्यवस्थापकांच्या अनागोंदी कारभाराने “काले- कराड- मसूर’ या शटल बससेवेचे तीन तेरा वाजले. विद्यार्थ्यांची परीक्षा असतानाही आज या एसटी बस न आल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागले आहे. त्यामुळे संतप्त विद्यार्थी व प्रवाशांनी आगार प्रमुखांना घेराव घालून याबाबत जाब विचारला. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर तणाव निवळला.

काले- कराड- काले ही शटल सेवा काही दिवसांपासून वेळेत सुरु नसल्याने विद्यार्थी व प्रवाशांचे मोठे हाल होत होते. यामुळे संतप्त विद्यार्थी व प्रवाशांकडून काले येथे गुरुवारी सकाळी बस रोखण्यात आल्या. कराड आगार व्यवस्थापनाकडून सकाळच्या सत्रात सात व दुपारच्या सत्रात
सात अशा 14 बस काले-कराड- मसूर मार्गावर सुरू केल्या होत्या. आता या मार्गावरील विद्यार्थी व प्रवासी संख्या वाढली असतानाही आगार व्यवस्थापकांकडून सकाळच्या सत्रात तीन आणि दुपारच्या सत्रात तीनच बस सोडण्यात आल्या. कराड आगारात तक्रार देण्यासाठी गेलेल्या प्रवाशांना वाहतूक नियंत्रक व व्यवस्थापनाकडून अनेकदा उडवाउडवीची उत्तरे देण्यात येतात. एसटी सेवा सुरळीत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून अनेकजण परीक्षेस मुकले आहेत.

काले येथे एसटी बस अडवल्यावर आगार व्यवस्थापक आंदोलनाच्या ठिकाणी आल्याशिवाय रोखलेल्या बस न सोडण्याचा आक्रमक पवित्रा येथील संतप्त विद्यार्थी व प्रवाशांनी घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. एसटी बस घेऊन आलेल्या चालक-वाहकांनी ही माहिती आगारप्रमुखांना दिल्यानंतर आगारप्रमुखांनी आंदोलक प्रवाशांनाच कराड आगारात येऊन भेटा, असा अजब सल्ला दिला. त्यानंतर वातावरण आणखीच तणावाचे झाले.

आगारप्रमुख आंदोलनस्थळी आले. परंतु परिस्थिती व घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधिकारी बी. एन. तांदळे, उपसरपंच अरुण साठे, पोलीस पाटील शुभांगी पाटील काले बसस्थानकावर आल्यानंतर विद्यार्थ्यांनी व प्रवाशांनी आपल्या समस्या मांडल्या. यावेळी 400 ते 500 विद्यार्थी व प्रवासी या ठिकाणी उपस्थित होते. आगारप्रमुख जे. डी. पाटील यांनी उद्यापासून काले-मसूर ही शटलसेवा पूर्ववत सुरू होईल, असे तोंडी आश्‍वासन दिल्यानंतर तणाव निवळला व अडवलेल्या बस प्रवाशांनी सोडून दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.