अथेन्स (ग्रीस) – सागरी प्रवासादरम्यान अडचणीत सापडलेल्या 62 पेक्षा अधिक शरणार्थ्यांना ग्रीसने सोडवले आहे. हे शरणार्थी ग्रीसच्या पूर्वेकडील एजियन समुद्रातून प्रवास करत होते. आज पहाटेच्या सुमारास या शरणार्थ्यांनी मदतीचे आवाहन केल्यानंतर ग्रीसच्या तटरक्षक दलाने शोध आणि बचाव मोहीम सुरू केली. कोसेटाच्या दक्षिणेला असलेल्या सायमा या निर्जन बेटाजवळ समुद्र खवळलेला असल्यामुळे हे प्रवासी अडचणीत सापडले होते.
बुडायला लागलेल्या बोटीवर असलेल्या या प्रवाशांना जर्मनीचा ध्वज असलेल्या मालवाहू कंटेनर जहाजाने सोडवले, असे ग्रीसच्या तटरक्षक दलाने म्हटले आहे. या बोटीवरील कोणी बेपत्ता झाल्याची कोणतीही माहिती उपलब्ध नाही. या बोटीवरून वाचवण्यात आलेल्या प्रवाशांना नंतर तटरक्षक दलाच्या नौकांमधून कोस बेटावर आणण्यात आले. हे सर्वजण कोणत्या देशाचे आहेत, हे समजू शकलेले नाही.
#RussiaUkraineWar : रशियाच्या युद्धखोरीला आळा घालण्यासाठी अमेरिकेने उचलले मोठे पाऊल
मध्यपूर्व, आशिया आणि आफ्रिकेतील दारिद्य्र आणि संघर्षाला कंटाळून शेकडो जण सागरी मार्गांनी युरोपीय संघाच्या सदस्य देशांमध्ये पलायन करत असतात. यातील बरेच जण ग्रीसआणि इटलीमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र असुरक्षित सागरी प्रवासादरम्यान होणाऱ्या दुर्घटनांमध्ये शेकडो शरणार्थ्यांचा बुडून मृत्यू होत असतो.