वॉशिंग्टन – युक्रेनविरोधातल्या युद्धात रशियाला मदत करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांवर अमेरिका कडक निर्बंध घालणार आहे. या निर्बंधांतर्गत आता अशा व्यक्ती आणि संस्थांची अमेरिकेतील मालमत्ता लिलाव करण्यात येणार आहे. “जी-20′ परिषदेसाठी इंडोनेशियातील बाली येथे आलेल्या अमेरिकेच्या अर्थमंत्री जेनेट येलेन यांनी ही माहिती दिली.
रशियाला मदत करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांच्या यादीमध्ये जगभरातील 28 कंपन्या आणि 14 व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे. या यादीमध्ये आणखीन काही कंपन्यांचा समावेश करण्यात येणार आहे. रशियाच्या युद्धखोरीला आळा घालण्यासाठी अमेरिकेने उचललेले हे आणखीन एक मोठे पाऊल आहे. रशियाला शस्त्रे पुरवण्यावर जे निर्बंध घालण्यात आले आहेत, त्याच्या अंमलबजावणीचा भाग म्हणून हे लिलाव करण्यात येणार असल्याचे येलेन म्हणाल्या.
या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या कंपन्या रशियाला तांत्रिक आणि आर्थिक मदत पुरवत होत्या. तसेच इराणकडून ड्रोन खरेदी करण्यासाठीही या कंपन्या रशियाला मदत करत होत्या, असेही येलेन यांनी सांगितले.
ASEAN summit : उत्तर कोरियाविरोधात अमेरिका, जपान, दक्षिण कोरिया एकत्र
रशियावरच्या निर्बंधांतर्गत रशियाला मदत करणाऱ्या आणि अमेरिकेतही व्यापार करणाऱ्या कंपन्यांवरही निर्बंध घालण्यात आले आहेत.