अथेन्स :- ग्रीकच्या ऱ्होडस बेटावर भडकलेल्या वणव्यामुळे तब्बल 19 हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. येथील जंगलामध्ये तीन ठिकाणी प्रचंड मोठे वणवे भडकले असून, गेल्या 6 दिवसांपासून हे वणवे विझवण्याचे अव्याहत प्रयत्न सुरू आहेत, असे ग्रीक प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
वणव्यामुळे प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने लोकांचे स्थलांतर करावे लागले आहे, असे वातावरण बदल आणि नागरी सुरक्षा मंत्रालयाच्या वतीने सांगगण्यात आले.
एकूण 12 गावे आणि काही हॉटेलांमधील सुमारे 16 हजार लोकांना जमिनीवरच्या वाहनांमधून आणि 3 हजार जणांना सागरी मार्गाने स्थलांतरित करण्यात आले आहे. यामुळे वणव्यांमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीच्या धुरामुळे श्वास गुदमरल्यामुळे 6 जणांना अल्प काळासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
वणवा विझवण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरूनही मदत पाठवली जाते आहे. तुर्कीये आणि क्रोएशियाची अग्निशामक दलाची पथकेही ग्रीसमध्ये दाखल झाली आहेत. ग्रीकमध्ये सध्या उष्णतेची लाट असून, राजधानीमध्ये 43 अंश सेल्शिअस तापमान नोंदवले गेले आहे.