लंडन – ओमायक्रॉन लाटेनंतर करोना परत येईल, मात्र, त्याची साथ नसेल, असे स्पष्ट करत लान्सेटच्या संशोधन अहवालात नजिकच्या भविष्यात करोनाची साथ संपण्याचे संकेत देण्यात आले आहेत. कोविड 19 हा वारंवार होणारा आजार असेल आणि आरोग्य यंत्रणा आणि समाजाला त्याचे व्यवस्थापन करावे लागेल. मात्र सार्स-कोव्ह-2 चा संसर्ग प्रसार रोखण्यासाठी सरकार आणि समाजाला कराव्या लागणाऱ्या अभूतपूर्व उपाय योजनांचे पर्व लवकरच संपेल, असे या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.
या विषाणूचा संसर्ग होतच राहील असे नमूद करून या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे की, रोगप्रतिकारक शक्ती, वातावरणातील बदल किंवा लसीकरण मोहीम कमी झाल्यास याच्या संसर्गाला संधी मिळू शकेल. यापुढे कदाचित हिवाळ्यात याचे प्रमाण वाढू शकेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
मात्र, या विषाणूचा होणारा परिणाम कमी असेल. यापुर्वीच या विषाणुचा झालेला अभ्यास अधिक असल्याने आणि विषाणूच्या नव्या आवृत्तीवर नियमितपणे लस मिळत असल्याने त्याचा आरोग्यावर होणारा प्रभाव कमी होत जाईल. उच्च दर्जाचे मास्क आणि सार्वजनिक अंतर यांचा वापर करून मानवी जीव वाचवता येतील, असे त्यात म्हटले आहे.
आता ज्या देशांमंध्ये ओमायक्रॉन पोहोचला नाही त्या देशांमध्ये नव्या ओमायक्रॉन लाटेचा पिक येईल. जसे की पूर्व युरोपीय राष्ट्रे आणि दक्षिणपूर्व आशिया. तेथे कामावर अनेक लोक अनुपस्थित राहण्याचे प्रमाण वाढण्याचे किंवा शाळा बंद राहण्यासारखे अडथळे येण्याची शक्यता आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
ओमायक्रॉनच्या पर्वात नियंत्रणात आणण्याच्या उपाययोजना पुन्हा तयार करण्याची गरज निर्माण झाली आहे. संसर्गिताशी संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध ही उपाय योजना कामी आली नसल्याचे सांगण्यात आले.
ही साथ आटोक्यात आणण्यासाठी जगभरातील देशांनी आणि समाजाने केलेले प्रयत्न अधोरेखीत करून ते कसे बदलत गेले आणि त्यामुळे प्राण वाचले याचा उहापोह या अभ्यासात करण्यात आला आहे. या नव्याने आलेल्या विषाणूचा मुकाबला करताना समाजाच्या जीवनविषयक सवयी मोठ्या प्रमाणावर बदलल्या. त्याचा प्रतिकार करताना आखलेल्या धोरणात्मक उपाययोजनांमुळे असंख्य नागरिकांचे जीव वाचले असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे.