नवी दिल्ली – उत्तरप्रदेशच्या युवकांना रोजगाराच्या व विकासाच्या संधी देणारा एक स्वतंत्र जाहीरनामा कॉंग्रेसने आज प्रकाशित केला. कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या उपस्थितीत या जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले. हा जाहीरनामा म्हणजे केवळ पक्षाची पोकळ बडबड नाही, तज्ज्ञांशी चर्चा करून उत्तरप्रदेशातील युवकांसाठी तो तयार करण्यात आला असून त्याच्या अंमलबजाणीनंतर तेथे मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात असे कॉंग्रेसने म्हटले आहे.
यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, आता भारतासाठी नव्या विचारांची गरज असून या नव्या विचारांना उत्तरप्रदेशपासून प्रारंभ होणार आहे. भर्ती विधान या नावाने हा जाहीरनामा तयार करण्यात आला असून राहुल गांधी यांनी म्हटले आहे., उत्तरप्रदेशच्या युवकांना नेमका रस्ता दाखवून त्यांच्या विकासाचे काम केवळ कॉंग्रेस पक्षच करू शकतो.
यावेळी बोलताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, आज उत्तरप्रदेशातील युवकांपुढे नोकरीची भीषण समस्या निर्माण झाली असून ती त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. प्रत्येक राजकीय पक्षच युवकांसाठी 25-30 लाख नोकऱ्या तयार करण्याचे आश्वासन देतो. पण हे नेमके कसे करणार यावर ते काही भाष्य करीत नाहीत. आम्ही या जाहीरनाम्यात हे कसे करणार आहोत याचे व्हिजन सादर केले आहे.