नवी दिल्ली – केजरीवाल सरकारने दिल्लीकरांना मोठा दिलासा देणारा निर्णय गुरूवारी घेतला. त्या सरकारने डिझेलवर आकारण्यात येणारा मूल्यवर्धित कर (व्हॅट) 30 टक्क्यांवरून 16.75 टक्क्यांपर्यंत कमी केला. त्यामुळे ते इंधन 8 रूपये 36 पैशांनी स्वस्त झाले आहे.
डिझेलवर मोठा व्हॅट आकारण्यात येत असल्याने मागील काही दिवसांपासून त्या इंधनाचा दर दिल्लीत पेट्रोलपेक्षा अधिक झाला. सध्या दिल्लीत डिझेलचा दर 82 रूपयांच्या घरात पोहचला होता. तर पेट्रोलचा दर 80 रूपयांपेक्षा अधिक आहे.
एवढेच नव्हे तर, दिल्लीपेक्षा नोएडा, गाझियाबाद आणि गुरूग्राम यांसारख्या लगतच्या शहरांत डिझेलचे दर तुलनेने कमी आहेत. त्यापार्श्वभूमीवर, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी डिझेलवरील व्हॅट कमी करण्याची घोषणा केली.
करोना संकटामुळे दिल्लीच्या अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. डिझेलबाबतच्या निर्णयामुळे दिल्लीच्या अर्थव्यवस्थेला उभारी मिळण्यास हातभार लागेल, असा विश्वास केजरीवाल यांनी व्यक्त केला. व्हॅटबाबतच्या निर्णयामुळे दिल्लीतील डिझेलचा दर आता पेट्रोलच्या दरापेक्षा कमी झाला आहे.