बंगळुरु – सामाजिक एकतेचे उत्कृष्ट उदाहरण कर्नाटकातील विजयपुरा येथे पाहायला मिळाले. येथील एका मुस्लिम गृहस्थाने अनाथ झालेल्या एका हिंदू मुलीचा 10 वर्षं सांभाळ केला आणि त्यानंतर तिचे हिंदू मुलाशी लग्नही लावून दिले आहे. महबूब मसली असे मुलीचा सांभाळ केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी 18 वर्षांच्या पूजाचे वैदिक पद्धतीने एका हिंदू मुलासोबत लग्न लावून दिले आणि तिला माहेरातून सासरी पाठवले.
आई-वडील दोघांचेही छत्र हरपल्यामुळे पूजा वाडिगेरी 10 वर्षांपूर्वीच अनाथ झाली होती. तिच्या नातेवाईकांनी तिचा सांभाळ करण्याची जबाबदारी झटकली. त्यानंतर मसली यांनी तिचा सांभाळ केला. मसली यांना स्वत: च्या दोन मुली आणि दोन मुलं आहेत. त्यांनी पूजाचाही आपल्या तिसऱ्या मुलीप्रमाणे सांभाळ केला.
मसली म्हणाले, ‘पूजा 10 वर्षांहून अधिक काळ माझ्या घरात राहिली पण मी तिला इस्लाम धर्म स्वीकारायला सांगितलं नाही. तिचं धर्मांतर केलं नाही किंवा एखाद्या मुस्लिम व्यक्तीबरोबर तिचे लग्नही लावून दिले नाही. तसे करणे आमच्या धर्माविरुद्ध आहे. त्यामुळे ती ज्या धर्माची म्हणजे हिंदू धर्माची आहे त्या धर्माच्या मुलाशी तिचे लग्न लावून देणे ही माझी जबाबदारी होती. त्यानुसारच मी एक सुयोग्य हिंदू मुलगा शोधला आणि त्यांचा विवाह करून दिला.’ एएनआय या वृत्तसंस्थेशी मसली यांनी संवाद साधला त्यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केली. ‘या हिंदू मुलाच्या आईवडिलांनी कुठलाही हुंडा न मागता हसत हसत पूजाचा स्वीकार केला.
आपल्या या पित्याबद्दल पूजा म्हणाली, ‘माझे जन्मदाते आईवडिल गेल्यानंतर मला असे आई-वडिल मिळाले हे माझे भाग्य समजते. त्यांनी माझा सांभाळ केला आणि माझे लग्न लावून दिले. मला त्यांच्या ऋणात सदैव रहायला आवडेल.’