ग्रेट पुस्तक : शंखातील माणूस

रंगनाथ पठारे यांच्या मॅजेस्टिक प्रकाशनने प्रकाशित केलेल्या “शंखातील माणूस’मधील कथांमध्ये लेखक कथारचनेच्या विविध शक्‍यतांशी खेळत असल्याचे जाणवते. या प्रकारची रचना, मांडणी मराठी कथांमध्ये कमी आढळते. प्रत्येक कथेमधल्या पात्राच्या मनातल्या विचारांची घुसळण वाचकाला वेगळ्याच आवर्तात नेऊन पोचवते.

“मैफलीनंतर’ ही कथा म्हटलं तर एक असोशीची प्रेमकथा आहे. पण मैफल संपल्यानंतर अस्सल उरतं ते आपलं एकटेपण; ही समंजस जाणीव या कथेतून होत जाते. “माणूस अंतिमतः एकटा असतो.’ ही भावना या पुस्तकातल्या कथांमधून बऱ्याचदा अधोरेखित होते. “तिच्या स्वप्नांची दुनिया’मधली यमुनाची स्वतःत चाललेली जीवघेणी घालमेलही लेखक खूप खोलातून जिवंत करतो.

यातील काही कथांचं स्वरूप वरवर दिसणाऱ्या घटनांमागचं सत्यदर्शन, त्याचे वेगवेगळे पैलू, निरनिराळ्या कोनातून केलेला विचार असं आहे. “पर्याय’, “तीन थिंकर त्रिधा’, “खाजगीपणाचं वस्त्र’, “गांधीजी 11 सप्टेंबर 2001′, “म्हणायची तर गोष्ट’ या कथा अशा प्रकारच्या आहेत. गांधीजी 11 सप्टेंबर 2001 या कथेमधे लेखकाचे गांधीजींबरोबरचे संवाद लिहिले आहेत. ही कथा खरं तर फॅंटसी म्हणून वाचता येऊ शकते. पण पठारेंनी ज्या प्रकारे ती लिहिली आहे, त्यामुळे ती फॅंटसी न वाटता एक तत्त्वज्ञानकथा वाटते. ते लिहितात, “गांधीजी काही वारंवार जन्माला नाहीत येत. … एकदा होऊन गेलेत ना! आत्ता आत्ता तर होते. ठेवायचे साठवून. ……गांधीजींची गरज असेल तर उरवा त्यांना किंवा आज वाटत असेल तर काढा मनातून बाहेर आणि जा सामोरे…. पण प्रत्यक्षात असं काही करता येत नाही. या दुनियेत माणसाला आता फक्‍त पाहता येतं, ऐकता येतं. ताबा कशावरच नसतो.’ ही संपूर्ण कथा पुन्हापुन्हा वाचावी अशी आहे. लेखक गांधीजींना प्रश्‍नावर प्रश्‍न विचारतो.

प्रत्येक प्रश्‍नाच्या वेळी वाटतं, आता गांधीजी निरुत्तर होतील. कारण जग बदललेलं आहे, हे आताच्या काळातले प्रश्‍न आहेत. पण लेखकानं गांधीजींच्या तत्त्वज्ञानाचं सूत्र पक्कं धरून ठेवलेलं आणि त्यातून प्रत्येक प्रश्‍नाचं उत्तर हाती येतं.

“पर्याय’ ही कथा सत्त्वशोध घेणारी वाटते. राजकारणाचं स्वार्थलोलुप, दगाबाजीचं दर्शन या कथेत होत जातं. अगदी लहानसहान तपशील भरत लेखक राजकारणाचा सारा माहोल आपल्या डोळ्यासमोर उभा करतो. “इतकी साधी गोष्ट’, “त्याची, तिची माझी गोष्ट’, “नात्याच्यी गोष्ट’ या कथांमधून “प्रेम’ ह्या एका भावनेमधे केवढी गुंतागुंत असते, आपल्याला स्वतःलासुद्धा कळणार नाही असे किती ताणेबाणे त्यात अडकलेले असतात ते लेखकानं दाखवलं आहे. “मैफलीनंतर’, “इतकी साधी गोष्ट’ या कथांमधे लेखक प्रेमाविषयी जे जे सांगतो, ते ते इतकं मनस्वी उत्कटतेनं सांगतो की, ते मान्य करण्याखेरीज आपल्याला गत्यंतर राहात नाही.

“शंखातला माणूस’ ही एका आत्ममग्न माणसाची कथा आहे. कथा म्हणण्यापेक्षा ती अवस्था आहे. समकालीन वास्तवाला एका संवेदनशील व्यक्‍तीनं दिलेली तीव्र प्रतिक्रिया आहे. दिवसेंदिवस सगळ्याचं बाजारीकरण होत चाललेलं पाहून आतल्या आत वस्तू व्हायला नकार देणं म्हणजे चिडणं. शंख करणं. माणूस असण्याची खूण. लोपत चाललेली जिवंतपणाची निशाणी. शंखात जाणं ही जिवंत असण्याचं भान देणारी कृती असं या कथेतल्या नायकाला वाटतं.

रंगनाथ पठारेंच्या काही कथांमधे तिरकसपणा, उपहास यांचा वापर केलेला आहे आणि म्हणून या कथा अधिक भेदक होतात. जसा विषय असेल तशी त्यांची भाषा लवचिकपणे वावरते. नात्यांचा गुंता हळुवारपणे उलगडताना, “देण्याघेण्याचा अत्यंत कोमल उत्सव’. “प्रत्येकाची नजर वेगळी, उजेड वेगळा, प्रत्येकाचं पाहणं वेगळं’, “नजरेचं खुनी दर्जाचं मैथुन’ असेही शब्दप्रयोग ते वापरतात.

प्रत्येक कथेमधे असा एखादा तरी प्रसंग आहे, एखादा तरी संवाद आहे की, तो वाचून हे कसं मांडता आलं या लेखकाला याचं आश्‍चर्य आणि कौतुक वाटतं. खरं तर या सगळ्या कथा लेखकाच्याच शब्दात, त्याच्याच शैलीत मुळातून वाचायला हव्यात. तरच त्यातली खरी मजा अनुभवायला मिळेल.

– माधुरी तळवलकर

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.