गाभुळलेली चिंच-एक आठवण

माणसाला कधी कशाकशाची आठवण येईल हे काही सांगता येत नाही. कालचीच गोष्ट घ्या. कालच दादाने चिंचा आणल्या होत्या. तो आणि त्याचा मित्र कोठे तरी फिरायला गेले होते. तेथे चिंचेची झाडे दिसली बरीच. मग काय या सर्वांना जुन्या आठवणी आल्या, चिंचा पाडण्याच्या. जवळपास पडलेले दगड उचलले आणि केला मारा झाडावर. झाड चिंचांनी नुसते लगडलेले होते. 15-20 मिनिटातच चांगल्या सॅकभर चिंचा गोळा केल्या आणि आले घरी. लहानपणी खिसा भरून चिंचा आणायचे, आता सॅक भरून चिंचा आणल्या. घरी आल्यावर खाली चटईवर सॅक मोकळी केली.

चिंचांचा तो ढीग पाहून तोंडाला नुसते पाणी सुटले. कित्येक वर्षात अशा पोटभर चिंचा पाहिल्यासुद्धा नव्हत्या, मग खाण्याची गोष्ट दूरच. त्या ढिगातील गाभुऴलेल्या चिंचा निवडून काढल्या आणि शांतपणे टेरेसमध्ये बसून चिंचा खायला सुरुवात केली.

चिंचा खात असताना आठवण झाली, की वाढत्या वयानुसार आपण कितीतरी गोष्टींचा आनंद विसरून गेलो आहोत. काय काय गोष्टी सोडल्या ह्याचा आढावा घेताना हातातील चिंचांवरून लक्षात आलं की आपण गाभुळलेली चिंच बऱ्याच वर्षात खाल्ली नाही.

मग त्यावरून आठवले बुढ्ढीका बाल खाऊन देखील अनेक वर्षे झाली आहेत. खरं तर त्याची आठवणसुद्धा राहिलेली नाही. आता तर बुढ्ढीका बालवाले दिसतही नाहीत. जिभेवर ठेवताच विरघळून जाणारा बुढ्ढीका बाल परत एकदा खावासा वाटू लागला. त्यानंतर आठवली ती चिक्की. चिक्कीवाला हातातील काठीला चिक्की लावून यायचा आणि चिक्कीच्या अनेक वस्तू करून द्यायचा. घड्याळ, सायकल, गाडी, विदूषक असे अनेक आकार करून तो आमच्या मनगटावर चिकटवून द्यायचा. मग मनगटावरील ती चिक्की चाटून खाताना मोठी मजा यायची. आम्ही वाड्यातील सारी मुले आपापल्या मनगटांवरील चिक्‍क्‍या एकमेकांना दाखवून खात राहायचो.

तेव्हा बाईस्कोपवाला वाड्यात नेहमी यायचा. मग चारपाच जण त्याच्या बाईस्कोपला डोळे लावून आतील चित्रे पाहात राहायचो. तेव्हा तो काही गाणीही म्हणायचा याची अंधुक आठवण आहे. बाईस्कोपवरून जत्रा आठवली. जत्रेतले ते गोल गोल फिरणारे पाळणे आठवले. पाळण्यात बसल्यावर पाळणा वर गेला की भीती वाटायची आणि मग डोळे घट्‌ट बंद करून घ्यायचो आम्ही. अनेक मुले तर पाळण्यात बसायचे म्हटले की भीतीने रडायचीच.

जत्रेतील ती कागदाच्या चित्रांची जादू आठवली. जत्रेत मिळणारी पत्र्याची शिट्टी शिट्टी आठवली, तशी शिट्टी किती तरी वर्षात वाजवलेली नाही. चटक्‍याच्या बिया घासुन एकमेकांना चटके द्यायचो ते आठवले. आता मात्र तसे चटके द्यावेत असं वाटत नाही, कारण आता आम्ही मोठे झालो आहोत.

तसंच कापसाची म्हातारी आजकाल दिसत नाही. आणि दिसली तरी तिच्या मागे धावून तिला पकडावी असे वाटायचे नाही. त्याची गंमतही वाटायची नाही. कापसाच्या त्या म्हातारीने उडता उडता आपला “बाळपणीचा काळ सुखाचा ” स्वत: बरोबर कधी नेला ते कळलंच नाही. त्या उडणाऱ्या म्हातारीने बरेच आनंद नेले आहेत. त्याच्या बदल्यात तिच वाढतं वय तिने आपल्याला दिलं. म्हणुन ती अजुनही ऊडु शकते. आपण मात्र जमिनीवरच आहोत.

बाकी जमिनीवर असणे ही किती महत्त्वाची गोष्ट आहे. जमिनीवरील पाय सुटले की संपले. आनंदच निसटला हातातून. हरवलाच म्हणाय्चा. तसे आता मोठेपणी आपण रोज काही तरी हरवत असतो आणि आपल्याला त्याचा पत्ताच नसतो. आपण नेमकं कशाला मुकतो आहोत हे अचूक उमगले नाही तरी चालेल पण त्याचा थोडासा का होईना अंदाज यायला हवा. मग आपले अनुभव समृद्ध होत जातात, यासाठी कुणी लेखक कवीच असायला हवं असं काही नाही. कोणत्याही सामान्य माणसाला हे शक्‍य आहे, हे सारे आठवले त्या गाभुळलेल्या चिंचेमुळे.

मात्र आता दोन चिंचा खाताच दात आंबले. तिसरे चिंच खायची इच्छा असूनही खाल्ली जाईना. ती तशीच हातात राहिली. लहानपणी किती किती चिंचा खायचो, तरी कधी दात आंबले नाहीत. आई नेहमी रागवायची की किती चिंचा खातेस? खोकला होईल. पण त्यामुळे कधी सर्दी खोकला झाल्याचे आठवत नाही.

– मृणाल गुरव

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.