कोल्हापूर जिल्ह्यात पाणी बाणी; शेती आणि उद्योगासाठी अनिश्‍चित कालावधीसाठी उपसा बंदी

कोल्हापुर- पाणीदार जिल्हा अशी ओळख असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यावर पाणीबानी निर्माण झाली आहे. कोल्हापूरच्या पंचगंगा, भोगावती नदीवर शेती आणि उद्योगासाठी अनिश्‍चित कालावधीसाठी उपसा बंदी करण्यात आली आहे. आज पासून याची अंमलबजावणी करण्याचे आदेश पाटबंधारे विभागाने दिले आहेत. नदीतील पाणी केवळ पिण्यासाठीच वापरण्यात येणार असून, अन्य कारणांसाठी उपसा झाल्यास कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

राधानगरी, तुळशी व दूधगंगा या मोठ्या धरणातील तर कुंभी, कासारी आणि कडवी या मध्यम प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठा पावसाळा सुरू होईपर्यंत पुरवणे आवश्यक आहे. यामुळे भोगावती व पंचगंगा नदीसह कुंभी आणि कासारी नदीवरही उपसा बंदी लागू करण्यात आली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी सह इतर सर्वच धरणांमधील आणि लघु पाटबंधारे प्रकल्पांमधील पाणीसाठा कमी झाल्याने कोल्हापूर जिल्हा वरती पाणी पाणीच संकट ओढवले आहे. यानुषंगाने कोल्हापूर विभागाची महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे समवेत पाणीटंचाईबाबत बैठक पार पडली.

या बैठकीत जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या बाबतीत संपूर्ण माहिती देण्यात आली यावेळी  जिल्ह्यातील पाणीसाठा अत्यल्प असून तो फक्त पिण्यासाठीच वापरला जाण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या. शेतीसाठी आणि उद्योगासाठी लागणारे पाणी उपश्या वरती बंदी घालण्यात आली.

भोगावती नदीवरील राधानगरी धरण ते करवीर तालुक्यातील खडक कोगे बंधार्‍यापर्यंत तसेच खडक कोगे ते शिरोळ तालुक्यातील शिरोळ बंधार्‍यापर्यंत पंचगंगा नदीवर आणि कुंभी प्रकल्प ते सांगरूळ येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा तसेच कासारी प्रकल्प ते यवलूज-पोर्ले येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्‍यापर्यंत दोन्ही तिरावर पाणी उपसा करता येणार नाही.

आजपासून लागू केलेली ही उपसा बंदी पाऊस सुरू झाल्यानंतर अथवा परिस्थितीनुसार जे आदेश काढण्यात येतील, त्या कालावधीपर्यंत लागू राहणार आहेत. या कालावधीत पाण्यावरील उभी असणारी पिके जोपासण्यासाठी आधुनिक सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापरा करावा, अशी सूचनाही पाटबंधारे विभागाने केली आहे.

उपसाबंदी कालावधीत शेतीसाठी अथवा औद्योगिक कारणांसाठी पाणी उपसा केल्याचे आढळून आल्यास उपसायंत्र जप्त करून एक वर्षे परवाना रद्द केला जाईल, असेही विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.या कालावधीत नदीतील पाणी पातळीही कमी होणार आहे. यामुळे सांडपाणी, औद्योगिक वापरातील पाणी थेट नदीत सोडून पाणी प्रदूषित करू नये, प्रदूषित पाणी वाहून नेण्यासाठी अतिरिक्‍त पाणीसाठा उपलब्ध नसल्याने याबाबत संबंधितांनी दक्षता घ्यावी, असे आवाहनही पाटबंधारे विभागाने केले आहे.

सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागात पाणी पोहोचवण्यासाठी वारणा नदीवरही तीन दिवस उपसाबंदी लागू करण्यात आली आहे. दिनांक  7 ते  9 जून या कालावधीत ही उपसाबंदी करण्यात आली आहे. यानंतर दिनांक 10 ते 12 जून या कालावधीत पाणी उपसा करता येणार असल्याचेही पाटबंधारे विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.