त्यांचे हे पदक आम्हाला प्रेरणादायी; सहकाऱ्यांचा आनंदोत्सव
शिवानी पांढरे/पियुषा अवचर
पुणे- पोलीस दलात काम करायला मिळाले. जनतेची सेवा करायला मिळाली. हेच आमचे भाग्य. दोनच शब्दात सांगायचे तर कृतज्ञ मी कृतार्थ मी अशी मन:स्थिती आहे, अशा शब्दात राष्ट्रपती पदक विजेत्या पोलिस अधिकाऱ्यांनी आपली भावना दै. प्रभातशी बोलताना व्यक्त केली.
दैनिक प्रभात आणि डिजिटल प्रभातने पुरस्कार विजेत्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांचे मनोगत जाणून घेतले. त्यावेळी सहायक आयुक्त (गुन्हे) सुरेंद्रनाथ देशमुख, सहुाक उपनिरीक्षक विजय भोसले आणि पॉलराज अँथोनी यांनी आपल्या भावनांना शब्दरुप देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिस दलातील आपल्या कारकिर्दीचा पटही त्यांनी उलगडला.
दरम्यान पोलिसांच्या विशेष शाखेतील दोन सहकाऱ्यांना एकाच वेळी पदक मिळाल्याने तेथे उत्सवी वातावरण होते. काल उपायुक्त मितेश गट्टे यांनी या कर्मचाऱ्यांचा सत्कारही केला. त्यानंतरही सोमवारी अनेक कर्मचारी अभिनंदन करत होते. त्यांचे अभिनंदन करण्यासाठी काही माजी सहकारीही आवर्जून आले होते.
सुरेंद्रनाथ चव्हाण यांनी आपल्या आठवणींचा पट उलगडताना ट्रॅफिक कॉर्प योजनेतील त्यांचे योगदान आवर्जून सांगितले. तसेच मुंबईच्या शिवाजी महाराज टर्मिनसवरून बेपत्ता झालेली मुलगी अचुक तपासामुळे वाराणसीत सुखरूप सापडली, ही आठवण सांगताना त्यांना झालेला आनंद चेहऱ्यावरून ओसांडून वहात होता. खाकी वर्दीआड दडलेला माणूस त्यातून व्यक्त होत होता.
विजय भोसले यांनी पुण्यात दहशत निर्माण करणाऱ्या गुंडांचा बिमोड करण्यासाठी झोपडपट्टीदादा कायदा आणि मोक्कासारखे प्रस्ताव सादर करण्यापासून केलेल्या कामाचा उहापोह केला.
गेल्या 32-34 वर्षातील सेवेचे चीज झाले. हा पुरस्कार मिळाल्याने कुटुंबियांना झालेला आनंद वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. करोनाच्या लॉकडाऊनमध्ये भोसले यांनी केलेल्या कामाची पोहोच त्यांना या रुपात मिळाली, अशीही भावना त्यांचे माजी सहकारी प्रकाश बुर्ले यांनी व्यक्त केली.
विशेष शाखेमध्ये आज काम करत असताना विमानतळावर काम करत असताना आयबीकडून मिळालेल्या प्रशिक्षणाचा लाभ मला झाला. परदेशात आपल्या देशाची प्रतिमा वाईट निर्माण होऊ नये, यासाठी डोक्यावर बर्फ ठेवून शांतपणे आणि संयमाने येथे काम करावे लागते, असे सांगतानाच हे मिळालेले पदक पाहण्यासाठी सात महिन्यांपुर्वी निवर्तलेली माझी आई हवी होती, अशी आठवण सांगताना डोळ्यात आलेली आसवे ते रोखू शकले नाहीत.
विशेष शाखेतील महिला सहकारी आशा चौधरी, प्रिया आंधळकर अश्विनी दिघे यांसह संजय सांडभोर, राजेंद्र होनराव अनिलकुमार जाधव यांनीही हे पुरस्कार आम्हाला प्रेरणा देत राहतील अशी ग्वाही दिली