पौड, (वार्ताहर) -भारतीय जनता पार्टीच्या गाव चलो अभियानात संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुळशी तालुक्यातील नानेगांवात मुक्काम ठोकला. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सध्या संपूर्ण देशात गाव चलो अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत पक्षाच्या सर्व नेत्यांनी व मंञ्यांनी गावात जाऊन राहण्याचा आदेश संबंधित देण्यात आलेला आहे. याच अनुषंगाने राज्याचे उच्च, तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील मुळशी तालुक्यातील नाणेगावचा प्रवास केला.
यामध्ये त्यांनी गावच्या विठ्ठल मंदिरात जाऊन भजनात भाग घेतला. त्यानंतर ग्रामस्थांसोबत एकत्रितपणे स्नेह भोजनाचा आस्वादही घेतला. तिथल्या नागरिकांशी संवाद साधत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकोपयोगी योजनांची माहिती ग्रामस्थांना दिली.
गावातील महिला बचत गटाच्या महिलांनी मंञी पाटील यांच्याशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वात महिला सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणार्या योजनांची माहिती पाटील यांनी महिलांना दिली. तसेच, प्रधानमंत्री आवास योजना आणि पीएम किसान सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधून त्यांचे अनुभव जाणून घेतले. यावेळी माजी आमदार शरद ढमाले, भोर विधानसभा निवडणूक प्रमुख किरण दगडे, भाजपा तालुका अध्यक्ष राजाभाऊ वाघ, जिल्हा सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष सोपान निबुदे, जिल्हा उपाध्यक्ष विनायक ठोंबरे, वैशाली सणस, मारूती कुरूपे, बाळासाहेब कुरपे, तसेच मुळशी तालुक्यात भाजपाचे पदाधिकारी- कार्यकर्ते, नानेगावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.