सातारा (प्रतिनिधी) – सातारा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटाने आपले वर्चस्व अबाधित राखले. निवडणूक लागलेल्या 89 पैकी सर्वाधिक ग्रामपंचायतींमधील सत्ता आमदार गटाने काबीज केली आहे.
यापूर्वी सातारा तालुका हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला समजला जात होता; परंतु आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला. विधानसभा निवडणूक भाजपच्या तिकिटावर निवडून येऊनही नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांनी आपला करिष्मा कायम ठेवला. त्यातून त्यांनी राष्ट्रवादीला धक्का दिल्याचे मानले जाते. दरम्यान, शिवसेनेने काही जागांवर आपले उमेदवार उभे केले होते; परंतु त्यात यश न आल्याने शिवसेनेचा चंचूप्रवेश अपयशी ठरला.
सातारा तालुक्यातील 130 ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली होती. त्यापैकी 39 ग्रामपंचायतीची बिनविरोध निवडणूक झाल्याने उर्वरित 89 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक लागली होती. आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले गट, खा. उदयनराजे भोसले गट, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. गावागावात प्रचाराची राळ उडाली होती. छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात सोमवारी सकाळी एकूण 16 टेबलांवर मतमोजणी झाली. दुपारपर्यंत सर्व निकाल घोषित झाले.
ठोसेघरमध्ये शिवसेनेला अपयश
ठोसेघर ग्रामपंचायतीत आ. शिवेंद्रराजे भोसले गटाची सत्ता असून शिवसेनेने स्वतंत्र पॅनेल टाकले होते. या पॅनेलच्या प्रचारासाठी शिवेसनेचे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख नितीन बानुगडे-पाटील आले होते. त्यांनी काही लोकांच्या भेटी व जाहीर सभा घेतली होती.
या सभेमुळे विजय मिळेल, अशी शिवसेनेची अपेक्षा होती; परंतु आ. शिवेंद्रराजे गटाने शिवसेनेच्या पॅनेलला चितपट केल्याने बानुगडे-पाटील यांची डाळ शिजली नाही, असे म्हणावे लागेल.