पुणे – नुकत्याच निवडणूक झालेल्या जिल्ह्यातील 42 ग्रामपंचायतींच्या पहिल्या सभेची तसेच सरपंच व उपसरपंच निवडीची तारीख जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये जिल्ह्यात दि. 9 आणि 10 फेब्रुवारी अशा दोन टप्प्यात ही निवडणूक होणार आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात या ग्रामपंचायतींना सरपंच व उपसरपंच मिळणार असून नवीन सदस्यांच्या हाती ग्रामपंचायतीचा कारभार सोपविला जाणार आहे.
ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडूण आलेल्या सदस्यांमधून ग्रामपंचायतींमधील सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी सर्व तहसिलदारांना दिले आहेत.
या निवडणुकीसाठी अध्यासी अधिकारी म्हणून मंडल अधिकारी, अव्वल कारकून किंवा समकक्ष अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याच्या सूचना तहसिलदारांना दिल्या आहेत. यावेळी ग्रामपंचायतींच्या संख्या अधिक असल्याने आवश्यक तो पोलीस बंदोबस्त मिळण्यासाठी प्रत्येक तालुक्यात दोन टप्प्यात सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडणुका होणार आहे.
तसेच, पुरंदर तालुक्यातील पिंगोरी, हवेलीमधील शेवाळेवाडी, औताडे-हांडेवाडी आणि बारामतीमधील माळेगाव या चार ग्रामपंचायतींमध्ये एक द्वितीयांशाइतकी सदस्य पदे निवडून आलेली नसल्यामुळे त्या ठिकाणी प्रशासक नेमण्याच्या सूचना गटविकास अधिकारी यांना दिल्या आहेत.