चेन्नई – चेन्नई सुपर किंग्ज संघाने गेल्या वर्षीच्या आयपीएल स्पर्धेत अत्यंत सुमार कामगिरी केली असली तरीही माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्याकडेच संघाने नेतृत्व कायम राखले आहे. ही बातमी जाहीर झाली आणि धोनीच्याही करारात वाढ झाली.
आता आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक कमाई करत असलेल्या खेळाडूंमध्ये धोनी पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. आयपीएलमध्ये 150 कोटींची कमाई करणारा धोनी पहिलाच क्रिकेटपटू ठरला.
धोनीने या स्पर्धेच्या माध्यमातून 137 कोटी रुपये कमावले होते. ज्या दिवशी धोनीला चेन्नईने संघात कायम राखले त्या दिवशी धोनीने 150 कोटींचा टप्पा ओलांडला. धोनीला यंदाच्या स्पर्धेसाठी चेन्नईने 15 कोटींना पुन्हा एकदा करारबद्ध केले आहे. त्यामुळे त्याची या स्पर्धेतील कमाई 152 कोटी झाली आहे.
2018 सालापासून धोनीला प्रत्येक वर्षी चेन्नईकडून एक मोसमाचे 15 कोटी रुपये दिले जातात. 2008 साली धोनीला चेन्नईने 6 कोटींना विकत घेतले होते. त्यावेळी धोनी हा सर्वात महागडा खेळाडू ठरला होता.
अन्य खेळाडूंमध्ये धोनीनंतर विराट कोहलीचा नंबर लागतो. त्यानंतर हिटमॅन रोहित शर्माचा क्रमांक येतो. रोहितची आयपीएलच्या एका मोसमाची कमाई 15 कोटी असून एकूण कमाई 146 कोटी आहे. कोहलीला एका मोसमासाठी 17 कोटी मिळत असून त्याची एकूण कमाई रोहितपेक्षा दोन कोटींनी जास्त आहे.