आबुधाबी – वेस्ट इंडिजचा निकोलस पुरन याने येथे सुरू असलेल्या आबुधाबी टी-10 लीग क्रिकेट स्पर्धेत सदर्न वॉरिअर्सकडून वादळी फलंदाजी करताना तब्बल 12 षटकारांची आतषबाजी करत केवळ 26 चेंडूत 89 धावांची खेळी केली. या सामन्यात वॉरिअर्सने बंगाल टायगर्सचा 30 धावांनी पराभव केला.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वॉरिअर्सच्या फलंदाजांनी बंगाल टायगर्सच्या गोलंदाजांची पिसे काढली. पुरनने वेस्ट इंडिज तसेच आयपीएल स्पर्धेत किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळताना आपली आक्रमकता अनेकदा सिद्ध केली होती.
त्याने त्यावर कळस चढवताना बंगाल टायगर्सच्या गोलंदाजांनाही आपल्या आक्रमकतेचा झटका दिला. त्याने 26 चेंडूत 12 षटकार व 3 चौकारांच्या मदतीने 89 धावांची वादळी खेळी केली.
यातील 84 धावा त्याने चौकार व षटकारांच्या जोरावरच काढल्या. बंगाल टायगर्सला केवळ 132 धावाच करता आल्या.