गुगलने मोबाइल वापरकर्त्यांसाठी अनेक चांगल्या सुविधाही दिल्या. त्यातीलच एक म्हणजे जीपीएस ट्रॅकर. गुगल मॅंपच्या मदतीने आपण आपल्या घरातील किंवा अगदी कार्यालयातील व्यक्ती कोणत्या ठिकाणी आहे यावर लक्ष ठेवू शकतो. तसेच कामासाठी किंवा वैयक्तिक कारणासाठी प्रवास करताना नवीन शहरांमध्ये जेव्हा आपण कॅंब, टॅक्सी, रिक्षा बुक करतो तेव्हा ती योग्य मार्गाने चालली आहे की नाही हेही पाहण्यासाठी आपल्याला या गुगल ट्रॅकिंगचा उपयोग होतो.
सर्व आधुनिक चारचाकी अगदी नवीन दुचाकींमध्येही आता गुगल मॅप दाखवण्याची सुविधा दिलेली आहे. प्रवासामध्ये अनेक जण गुगल मॅप लावून निर्धास्तपणे प्रवास करू शकतात. रस्त्याच्या माहितीबरोबरच इतर सुविधांची माहितीही आपल्याला यामध्ये मिळते. जसे की पेट्रोल पंप किती अंतरावर आहे. प्रवासामध्ये भूक लागली असेल तर रेस्टॉरंट, धाबा, हॉटेल यांच्याविषयीही माहिती आपल्याला या मॅपच्या मदतीने सहज मिळते. महामार्गावर प्रवास करताना वाहनांच्या वेगाची मर्यादा, अपघात झाले असल्यास तातडीने मिळणारी वैद्यकीय माहिती, पोलिसांचे क्रमांक अशा अनेक गोष्टी आपल्याला प्रवासादरम्यान नक्कीच उपयोगी पडतात.
ऑनलाइन फूडपासून दैनंदिन गरजेच्या अनेक वस्तू प्रत्येक जण मागवत असतो. याच गुगल ट्रॅकरच्या मदतीने डिलिव्हरी देणाऱ्या लोकांना ग्राहकांचा पत्ता शोधणे सोपे जाते. सामान्य माणसाच्या उपयोगी असणारी ही सुविधा वापरताना योग्य ती काळजी घेतली नाही तर मात्र सायबर गुन्ह्यांत अडकण्याची शक्यता असते.जेव्हा तुम्ही जीपीएस ट्रॅकरसारख्या गोष्टी वापरता, तेव्हा तुमची काही वैयक्तिक माहिती वापरण्याची परवानगी तुम्ही या ऍपला देता. ज्यामध्ये तुमचे स्वतःचे लोकेशन. या गोळा केलेल्या माहितीचा जर गैरवापर झाला तर तुम्ही घरापासून किती दूर आहात, तुम्ही काय करता, तुमचा दिनक्रम कसा आहे याविषयीची बारकाईने माहिती सायबर गुन्हेगारांना सहजपणे मिळू शकते. एक प्रकारे एखाद्या व्यक्तीवर पाळत ठेवण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो.
अगदी छोट्या आकारातील जीपीएस ट्रॅकरही बाजारामध्ये उपलब्ध आहेत. असे ट्रॅकर हे वन्य प्राण्यांची हालचाल टिपण्यासाठी वापरले जातात. त्याचप्रमाणे सायबर गुन्हेगार तुमच्या कारमध्ये किंवा तुमच्या बॅगमध्ये नकळतपणे ठेवून तुमच्या हालचालींवर लक्ष ठेवू शकतात.जगभरामधील अनेक उद्योग क्षेत्रांमध्ये स्वतःच्या कंपनीत काम करणाऱ्या लोकांसाठी प्रत्येक कंपनीची स्वतःची वाहतूक व्यवस्था असते. अशा वाहतुकीच्या ताफ्यांमध्ये बरेचदा एखाद्या लोकल व्यावसायिकाकडून गाड्या भाडेतत्त्वावर घेतल्या जातात. अशा वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या जीपीएस ट्रॅकरमधील असुरक्षिततेचा गैरफायदा सायबर गुन्हेगार घेऊ शकतात.
स्मार्ट वॉचेस ज्याचा उपयोग बहुतेक व्यायाम करणाऱ्या, जिमला जाणाऱ्या व्यक्ती वापरतात. दररोज आपण किती किलोमीटर चाललो हे बघण्यासाठी या स्मार्ट वॉचेसमध्ये जीपीएस ट्रॅकिंगचाच वापर केला जातो.
ज्येष्ठ नागरिकांच्या दैनंदिन हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सायबर गुन्हेगार बरेचदा याचा गैरवापर करतात.
जीपीएस ट्रॅकरच्या मदतीने पोलिसांना गुन्हेगार शोधण्यासाठी मदत होते. त्याचप्रमाणे तुमची वैयक्तिक माहिती जर गुन्हेगारांच्या हातात सापडली तर याच जीपीएस ट्रॅकरचा वापर गुन्ह्यांसाठीही केला जाऊ शकतो. त्यामुळे काही गोष्टींची खबरदारी घेणे गरजेचे आहे.
अशा सायबर गुन्ह्यांपासून वाचण्यासाठी…
1. जेव्हा तुम्ही कॅब/ऑटो बुक करताना जीपीएस ट्रॅकरवर स्वतःचे लोकेशन शेअर करता तेव्हा ते फक्त त्या वेळच्या वापरापुरतेच असावे. काम झाल्यानंतर आपले लोकेशन बंद करावे. अशी सुविधा तुमच्या मोबाइलमध्ये दिलेली असते.
2. अनोळखी ठिकाणचे असुरक्षित वाय- फाय वापरू नये. ज्यामुळे तुमचा ठावठिकाणा इतरांना समजू शकेल.
3. गरज नसेल तर कोणत्याही ऍपसाठी तुमचे लोकेशन शेअर करण्याची परवानगी देऊ नका.
4. आपल्या जवळच्या माणसांशिवाय इतर अनोळखी लोकांबरोबर तुमच्या मोबाइलमधील लोकेशन शेअर करू नका.
5. जेव्हा तुम्ही घरी असता तेव्हा तुमचे जीपीएस लोकेशन बंद ठेवा.
6. सोशल मीडिया वापरताना तुमचे लाइव्ह लोकेशन इतरांना दिसणार नाही याची काळजी घ्या.