सणसवाडीच्या पदाधिकारी व ग्रामस्थांची मागणी : पवारांची भेट
शिक्रापूर – सध्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे बिगुल वाजू लागले असून, आरक्षणदेखील जाहीर झालेले आहे. आरक्षण सोडत झाल्याने इच्छुकांमध्ये कही खुशी कही गम असे वातावरण निर्माण झालेले असताना जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या माजी सभापती सुजाता पवार यांनी सणसवाडी- कोरेगाव भीमा गटातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवावी, अशी मागणी सणसवाडीच्या पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी सुजाता पवार यांची भेट घेत केली आहे.
सणसवाडी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी नुकतीच पवार यांची भेट घेतली. यावेळी आरक्षणात या गटात सर्वसाधारण महिला असे आरक्षण निघाले आहे. जिल्हा परिषदेसाठी उमेदवार म्हणून आमदार अशोक पवार यांच्या पत्नी व कृषी व पशुसंवर्धनच्या माजी सभापती पवार यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याने कार्यकर्त्यांनी त्यांना याबाबत विनंती केली आहे.
यावेळी सरपंच संगीता हरगुडे, उपसरपंच सागर दरेकर, माजी विजयराज दरेकर, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय हरगुडे, राजेंद्र दरेकर, अक्षय कानडे, माजी सरपंच सुनंदा दरेकर, स्नेहल भुजबळ, शशिकला सातपुते, रूपाली दरेकर, सुवर्णा दरेकर, रमेश सातपुते, चेअरमन सुहास दरेकर, माजी चेअरमन बबुशा दरेकर, गोरख दरेकर, दगडू दरेकर, नवनाथ दरेकर, नवनाथ हरगुडे, रामदास दरेकर, राजेश भुजबळ, प्रशांत दरेकर उपस्थित होते.
सणसवाडी कोरेगाव भीमा गटातील सर्वात मोठे मतदान असून तालुक्यातील व जिल्ह्यातील मोठी पदे असणाऱ्या नेत्यांचे गाव आहे. झेडपी व पंचायत समिती निवडणुकीत महत्वपूर्ण भूमिका पार पाडणाऱ्या कार्यकर्त्यांनी सुजाता पवार यांना येथून निवडणूक लढवण्याची विनंती केली.
कुसुम मांढरेंच्या भूमिकेकडे लक्ष
सणसवाडी जिल्हा परिषद गटात यापूर्वी जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे यांनी मोठ्या प्रमाणात विकासकामे केलेली आहेत. विकासकामांच्या जोरावर त्यांनी पुन्हा येथून उमेदवारीसाठी तयारी केलेली आहे, सध्या येथे आरक्षित जागा झालेली असताना कुसुम मांढरे हे काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजपच्या भात्यात दिग्गज उमेदवार
भारतीय जनता पार्टीने या गटात निवडणूक लढवण्यासाठी दिग्गज उमेदवार आमच्याकडे असल्याचे यापूर्वी जाहीर केलेले आहे. लवकरच हे उमेदवार आम्ही जाहीर करू, असे भाजपाचे पदाधिकारी सांगत असल्याने नवीन पेच देखील यंदाच्या निवडणुकीत उभा राहण्याची दाट शक्यता आहे.