नाशिक: देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने चार महिन्यांपासून सलून सेवा बंद आहेत. यामुळे नाभिक समाजाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सलून व्यवसाय सुरु करण्यासाठी केंद्र सरकारकडून परवानगी नसल्यामुळे राज्य सरकारकडून परवानगी अद्याप दिलेली नाही. मात्र जर केंद्राने राज्यात सलून सुरु करण्यासाठी परवानगी दिली तर, राज्यातही सलून व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकारची तयारी आहे, अशी माहिती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
राष्ट्रीय नाभिक महासंघ संलग्न महाराष्ट्र नाभिक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी छगन भुजबळ यांची नाशिकमध्ये भेट घेतली. यावेळी त्यांनी नाभिक समाजाला लॉकडाऊन काळात झालेल्या अडचणींचे निवेदन दिले. करोनाच्या परिस्थितीत चार महिन्यांपासून सलून व्यवसाय पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे नाभिक समाज त्रस्त झाला आहे. अनेकजण कर्जबाजारी होऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
या सर्व बाबींचा विचार करून नाभिक समाजाचे सलून आणि पार्लर सुरु करण्यास परवानगी द्यावी. तसेच त्यांना आर्थिक सहाय्य देण्यात यावे, अशा काही मागण्या पदाधिकाऱ्यांनी भुजबळांसमोर मांडल्या. यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत सलून व्यावसायिकांच्या प्रश्नाबाबत सरकार सकारात्मक आहे. लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत चर्चा करुन सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन भुजबळांनी दिले.