पुणे, {प्रभात वृत्तसेवा} : मटण, मासळी, चिकनवर ताव मारून धुळवड साजरी करणारे खवय्ये यंदा नाराज झाले. धुळवड सोमवारी असल्यामुळे यावर्षी खवय्यांकडून मटण, मासळी, चिकनला बेताचीच मागणी राहिली.
होळीच्या दिवशी पुरणपाेळीचा बेत आखला जातो. दुसऱ्या दिवशी म्हणजेच धुळवडीला अनेकजण घरोघरी सामिष जेवणाचा बेत आखतात. नातेवाइक, मित्रमंडळींना निमंत्रणे दिली जातात. धुळवडीच्या दिवशी सकाळपासूनच मटण, मासळी बाजारात खरेदीसाठी खवय्यांच्या रांगा लागतात. यंदा धुळवड सोमवारी असल्याने मटण, मासळी, चिकनला बेताची मागणी राहिली. मटण, मासळी, चिकन खरेदीसाठी फारशी गर्दी झाल्याचे दिसले नाही.
याविषयी पुणे शहर मटण दुकानदार संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे म्हणाले की, दरवर्षी धुळवडीला मटणाला मागणी असते. सोमवारी सामिष पदार्थ निषिद्ध मानले जात असल्याने यंदा अपेक्षित मागणी राहिली नाही, तर पुणे, पिंपरी-चिंचवड बाॅयलर असोसिएशनचे संचालक रुपेश परदेशी यांनी सांगितले, की घरगुती ग्राहकांकडून चिकन आणि अंड्यांना मागणी नव्हती. हाॅटेल व्यावसायिकांकडून चिकनला मागणी बऱ्यापैकी होती. रविवारी मासळी, मटण, चिकनला मागणी असते. यंदा रविवारी होळी होती.
धुळवडीला सोमवार असल्याने मागणीत घट झाली. बुधवारी (२७ मार्च) तुकाराम बीज असून, गुरुवारी (२८ मार्च) संकष्टी चतुर्थी आहे. त्यामुळे मटण, मासळी, चिकनला बेताची मागणी असून, गुड फ्रायडेनंतर (२९ मार्च )मागणी वाढण्याची शक्यता असल्याची माहिती गणेश पेठ मासळी बाजारातील व्यापारी ठाकूर परदेशी यांनी सांगितले.
मटण, मासळी, चिकनचे किलोचे भाव
मटण – ७४० रुपये
चिकन – २२० रुपये
इंग्लिश अंडी – ७२ रुपये
पापलेट- १००० ते १६०० रुपये
हलवा – ७०० ते ८०० रुपये
सुरमई – ७०० ते ९०० रुपये
रावस – ७०० ते ९०० रुपये
कोळंबी – १८० ते ६०० रुपये