पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – वारजे येथील शास्त्री एज्युकेशन फाउंडेशनअंतर्गत अस्मा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या संस्थेने एमबीए अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अस्मा इन्स्टिट्यूटला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यामुळे या संस्थेवर कारवाईची टांगती तलवार आहे.
अस्मा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधील विद्यार्थिनीने तक्रार केल्यानंतर हे प्रकरण उजेडात आले. संस्थेच्या एमबीए अभ्यासक्रमास शुल्क नियमन समितीने ६५ हजार रुपये शुल्क निर्धारित केले होते. मात्र, इन्स्टिटयूटने विद्यार्थ्यांकडून दोन वर्षाचे ४ लाख ५० हजार रुपये शुल्क आकारले.
अतिरिक्त शुल्क आकारून सुद्धा प्रत्यक्षात या महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाचे शिक्षण दिले जात नाही. महाविद्यालयाने या अभ्यासक्रमासाठी त्रयस्थ संस्थेची नेमणूक करून हिंजवडी येथे या अभ्यासक्रमाचे लेक्चर्स घेतले. अस्मा संस्थेच्या माध्यमातून इंटर्नशिप आणि नोकरीचे आमिष दाखवून फसवण्यात आल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार नोंदविण्यात आली असून, विद्यापीठाला ही बाब निदर्शनास आणून दिली. . दरम्यान, या प्रकरणात दोषी असलेल्या अस्मा इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट या संस्थेवर कारवाई करावी, अशी मागणी विद्यार्थी संघटनांतून होत आहे.
अस्मा या संस्थेबाबत काही विद्यार्थ्यांकडून लेखी तक्रारी प्राप्त झाली आहे. त्यानंतर तत्काळ संबंधित संस्थेला विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. संस्थेचे उत्तर आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल. – डॉ. पराग काळकर, प्र-कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे