सांगली: भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे, अस विधान पडळकर यांनी केलं होत. त्यानंतर राज्यभर संतापाची लाट उमटली. पडळकरांचे प्रातिनिधिक पुतळे जाळण्यात आले.
दरम्यान, पंढरपुरात गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला चक्क दुग्धाभिषेक घालण्यात आला. तर सांगलीत 100 गाड्यांच्या ताफ्यासह पडळकरांची एण्ट्री झाली. पडळकर यांचे समर्थक त्यांना जाहीर पाठिंबा दर्शवित आहेत.
पवार यांच्यावर केलेल्या जहरी टीकेनंतर गोपीचंद पडळकर हे कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. त्यांच्या समर्थनार्थ चंद्रभागेच्या वाळवंटात दुग्धाभिषेक करण्यात आला. “पडळकर विरोधात आंदोलन करताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे भ्रष्ट हात आमच्या नेत्यांच्या प्रतिमेला लागल्यामुळे प्रतिमेला अभिषेक घालून शुद्ध केले”,असं समर्थकांनी म्हटलं आहे.
पडळकर याणी सांगली जिल्ह्यातील जत, आटपाडी तालुक्यातील करगणी, नागसफाटा आणि कवठेमहांकाळ परिसरात जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी एकच छंद गोपीचंद, अशा घोषणा देखील देण्यात आल्या.