वॉशिंग्टन – चीन कंबोडियामध्ये गुपचूप एक लष्करी तळ उभारत आहे, परदेशात चीनकडून उभारण्यात येत असलेला हा दुसरा आणि हिंद प्रशांत क्षेत्रात चीनकडून उभारण्यात येत असलेला हा पहिलाच लष्करी तळ असणार आहे. हा तळ कंबोडियाच्या रियाम नौदल तळाच्या उत्तरेला असणार आहे.
यापूर्वी चीनने पूर्व आफ्रिकेतील जिबूती या देशामध्ये अशाप्रकारचा लष्करी तळ उभारला आहे. या तळावर चीनचे सैन्य तैनात असणार आहेच. त्याशिवाय अमेरिकेच्या सैन्याच्या हालचालींवर चीनला लक्षही ठेवता येणार आहे, असे वॉशिंग्टनमधून प्रसिद्ध होणाऱ्या दैनिकातील एका वृत्तामध्ये म्हटले आहे.
जगभरात ठिकठिकाणी आपल्या सैन्याच्या तळाचे नेटवर्क करण्याचे चीनचे धोरण आहे. त्यानुसार कंबोडियामध्येही नौदलाचा तळ उभारला जात आहे. चीनला खऱ्या अर्थाने जागतिक महाशक्ती म्हणून पुढे यायचे आहे. या महत्वाकांक्षेतूनच चीनकडून हे नेटवर्क उभे केले जाते आहे. या नौदल तळावर मोठ्या संख्येने युद्धनौकांना तैनात करण्याची क्षमता असणार आहे. हिंद प्रशांत क्षेत्रावर आपला अधिक प्रभाव निर्माण करण्यासाठी चीनकडून या हालचाली सुरू आहेत.
या लष्करी तळाचा वापर करण्यासाठी चीनने गुपचूप एक करार देखील केला आहे, असे अमेरिकेच्या गुप्तचरांच्या हवाल्याने या वृत्तात म्हटले आहे. मात्र चीन आणि कंबोडिया या दोन्ही देशांनी याबाबतचे वृत्त फेटाळून लावले आहे.