पुणे, दि. 29 – पुणेकरांना आता “वंदे भारत’ ट्रेनने प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. सोलापूर-मुंबई या वंदे भारत एक्सप्रेसचे दि.10 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. त्यामुळे पुण्यातून पहिली वंदे भारत धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पुणे रेल्वे स्थानकातून पुणे-सिंकदराबाद व सोलापूर-मुंबई या दोन मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहेत. त्यापैकी सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 10 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल, मुंबई येथे होणार आहे. याबरोबरच साईनगर शिर्डी एक्स्प्रेसचे उद्घाटनही पंतप्रधान करतील. दरम्यान, ही ट्रेन सोलापूर स्थानकावरून दुपारी 3 वाजता मुंबईच्या दिशेने सुटेल.
मुंबई ते सोलापूर मार्गावर ही रेल्वे मार्ग ताशी 110 कि.मी.चा वेगाने धावेल. ती पुण्यामार्गे जाणार असल्यामुळे पुणेकरांना वंदे भारत एक्सप्रेस अनुभवता येणार आहे.
असे असेल वेळापत्रक
वंदे भारत एक्सप्रेस सोलापूरहून सकाळी 6 वाजून 05 मिनिटांनी सुटेल. ती पुण्यात 9 वाजता दाखल होईल. तर, मुंबईला दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी पोहचेल. त्याच दिवशी सायंकाळी 4 वाजून 10 मिनिटांनी
मुंबईहून सुटेल. सायंकाळी 7.30 च्या सुमारास पुण्याला
दाखल होईल. सोलापूरला रात्री 10 वाजून 40 मिनिटांनी पोचेल. ही सेवा आठवड्यातून सहा दिवस असेल. मुंबईहून बुधवारी व सोलापूरहुन गुरुवारी रेल्वे धावणार नाही.