सण-उत्सव काळात रेल्वे मंत्रालयाकडून प्रवाशांना ‘गुड न्यूज’

सणवारांच्या पार्श्‍वभुमीवर रेल्वे मंत्रालयाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली – आगामी सण-उत्सव काळातील अपेक्षित गर्दी टाळण्यासाठी, रेल्वे मंत्रालयाने सणवारांच्या काळात “उत्सव विशेष’गाड्यांच्या 392 फेऱ्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्या 20 ऑक्‍टोबर ते 30 नोव्हेंबर या काळात चालवल्या जातील. 

या गाड्यांसाठीचे तिकीट दर विशेष गाडयांच्या भाड्याप्रमाणेच आकारले जाईल. म्हणजे या “उत्सव विशेष’ रेल्वेगाड्यांच्या तिकीटांचे दर अन्य एक्‍सप्रेस रेल्वेगाड्यंच्या तिकीट दरांपेक्षा श्रेणीनुसार 10 ते 30 टक्‍क्‍यांनी अधिक असणार आहेत. 

आगामी काळात असलेल्या सणवाराच्या काळात नागरिक आपापल्या गावांना जाण्याच्या शक्‍यतेने संभाव्य गर्दी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे, असे रेल्वे मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

या उत्सव विशेष रेल्वेगाड्या कोलकाता, पाटणा, वाराणसी, लखनौ यासह अन्य प्रमुख शहरांसाठी चालवल्या जातील. दुर्गापूजा, दसरा, दिवाळी आणि छटपूजेच्या निमित्ताने असणाऱ्या सुट्यांच्या दिवसासाठी या रेल्वेगाड्या धावतील.

आतापर्यंत रेल्वेच्यावतीने 666 विशेष रेल्वेगाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. या रेल्वेगाड्या देशभरात नियमितपणे धावत आहेत. याशिवाय मुंबईतील काही उपनगरांसाठी आणि कोलकाता मेट्रोच्या काही गाड्याही चालवल्या जात आहेत.

या नवीन उत्सव विशेष रेल्वे गाड्या 30 नोव्हेंबरपर्यंतच चालवल्या जातील आणि त्यापुढे सुरू राहणार नाहीत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

करोनाच्या साथीच्या पार्श्‍वभुमीवर मार्च महिन्यापासून रेल्वेने नियमित सेवा स्थगित केली होती. केवळ आवश्‍यकता आणि मागणी नुसार रेल्वेसेवा उपलब्ध करून दिली जात होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.