गुड न्यूज : काही तासांत करोनाचा नायनाट करणारा गेम चेंजर नेसल स्प्रे भारतात दाखल होणार

करोना विरोधी लढ्यात गेम चेंजर ठरणार; कॅनडा, ब्रिटनमध्ये चाचण्या यशस्वी

लंडन – कॅनडातील एका कंपनीने नाकावाटे दिला जाणारा स्प्रे तयार केला आहे. त्याच्या कॅनडा आणि ब्रिटनमधील चाचण्यांत अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाले आहे. भारतातील सध्याच्या दुसऱ्या लाटेत हा स्प्रे गेमचेंजर ठरू शकतो असे हा स्प्रे तयार करण्याच्या प्रक्रियेत सहभागी असलेल्या इस्त्रायली शास्त्रज्ञाने म्हटले आहे.

यासाठी आम्हाला भारतात एका चांगल्या भागिदाराची गरज असून त्याचा आम्ही शोध घेतो आहोत. या स्प्रेला भारतात करोनाविरोधी उपकरण म्हणून मान्यता मिळेल अशी आम्हाला आशा असल्याचे सॅनोटाईज कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थापक डॉ. जीली रेगेव यांनी म्हटले आहे.

भारतातल्या प्रत्येक गावात जाऊन हा स्प्रे द्यायला आपल्याला आवडेल व हा स्प्रे वापरल्याने करोना होत नाही, हे सगळ्यांना पाहताही येईल असेही त्यांनी नमूद केले. गेल्याच वर्षी जर आपण स्प्रे बाजारात आणू शकलो असतो तर लाखो लोकांचे प्राण वाचवता आले असते असेही त्या म्हणाल्या.

नियामकांची परवानगी मिळवणे आणि व्यावसायिक स्तरावर त्याचे भरपूर उत्पादन सुरू करण्याला वेळ लागतो असे सांगत त्या पुढे म्हणाल्या की, ही वस्तू उपयुक्त आहे हे औषध तयार करणाऱ्या कंपन्या आणि नियामकांना पटवून देण्यासाठी डेटा तुमच्या हाती असावा लागतो. तथापी हा स्प्रे अत्यंत उपयुक्त असून सॅनिटायझर प्रमाणे त्याची छोटी बाटली तुम्ही तुमच्या सोबत ठेवू शकता आणि जेव्हा केव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा त्याचा वापरही करू शकतात. 

इस्त्रायलने अगोदरच त्याच्या वापराला मान्यता दिली असून तेथे हा स्प्रे महिनाभरात तीन अमेरिकी डॉलर एवढ्या किमतीत विकत घेता येणार आहे. भारतातही आम्हाला तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यासाठी आणि सगळीकडे वितरणासाठी एका भागिदाराची आवश्‍यकता असून आम्ही काही बड्या फार्मा कंपन्यांसोबत बोलणी सुरू करत असल्याचे त्यांनी सांगितले.

स्प्रे नाकाद्वारे दिल्यावर करोनाला अटकाव होतो आणि ज्याला अगोदरच करोना झाला आहे तो काही तासांत बरा होतो असा दावा कंपनीने केला आहे. कॅनडा आणि नंतर ब्रिटनमध्ये त्याच्या चाचण्या यशस्वी ठरल्या असून भारतातही मोठ्या प्रमाणात चाचणी घेण्याची त्यांची इच्छा आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.