कल्याण – गेल्या वर्षभरात शेकडो करोना रुग्णांना जीवदान देणाऱ्या डाॅक्टर पितापुत्राचा करोनामुळे मृत्यू झाल्याची घटना कल्याणमध्ये घडलीय. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डाॅ नागेंद्र मिश्रा आणि मुलगा डाॅक्टर सुरज मिश्रा अशी करोनामुळे मृत्यू पावलेल्या पितापुत्राची नावे आहेत. डाॅ. नागेंद्र यांचा काल वाढदिवस होता. वाढदिवसादिवसीच त्यांचा मृत्यू झाला. तर डाॅ. सुरज यांचा नुकताच नोव्हेंबरमध्ये विवाह झाला होता.
टिटवाळा खडवली परिसरात मागील 22 वर्षांपासून डाॅ. नागेंद्र क्लिनिक चालवत होते. तर मुलगा सुरजचे भिवंडी बापगावमध्ये क्लिनिक होते. गोरगरीब रुग्णांची सेवा करण्याच्या उद्देशाने त्यांनी ग्रामीण भागात क्लिनिक सुरु केले होते.
6 दिवसांपूर्वी अचानक ताप येऊ लागल्याने त्यांनी तपासणी केली असता करोना पाॅझिटिव्ह असल्याचे समजले. त्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले. सध्या राज्यात ऑक्सिजन बेडची कमतरता असल्याने दोघेही वेगवेगळ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. मात्र उपचार सुरु असताना बुधवारी 15 एप्रिलच्या रात्री दोघा पितापुत्राचे काही तासाच्या फरकाने निधन झाले.
डाॅक्टरकी सोबत समाजसेवा –
नागेंद्र मिश्रा डाॅक्टरसोबतच समाजसेवकही होते. गरीब रुग्णांच्या सेवेसाठी त्यांनी मुद्दामहून त्यांनी ग्रामीण भागात क्लिनिक उभारले होते. करोना काळात त्यांनी अनेक गरजु रुग्णांवर मोफत उपचार केले. लाॅकडाऊनमध्ये गरजूंना मदत केली. तसेच गरीबांना लग्नात ते घडेल ती मदत करत असत. त्यांच्या मृत्यूमुळे परिसरात नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत.