Gold Silver Rates| जागतिक बाजारात आज सोने आणि चांदीचे दर मोठ्या प्रमाणात कमी झाले. त्यामुळे भारतीय बाजारातही या दोन धातूचे दर त्या प्रमाणात कमी झाले. भारतात सोने फार कमी प्रमाणात तयार होते. त्यामुळे जागतिक किमतीनुसार भारतातील सोन्याच्या किमती ठरत असतात.
दिल्ली सराफात सोन्याचा दर 750 रुपयांनी कोसळून 62,350 रुपये प्रति दहा ग्रॅम या पातळीवर आला. दिल्ली सराफात चांदीचा दर तब्बल 1,400 रुपयांनी कोसळून 74 हजार रुपये प्रति किलो या पातळीवर गेला होता. एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक सौमिल गांधी यांनी सांगितले की, जागतिक बाजारातील संकेतानुसार वायदे बाजारात आणि स्पॉट मार्केटमध्येही सोने आणि चांदीचे दर पिछाडीवर आल्याचे वातावरण होते.
जागतिक बाजारात सोन्याचा दर 1,995 डॉलर आणि चांदीचा दर 21.97 डॉलर प्रति औंस या पातळीवर होता. आज जागतिक बाजारात सोन्याचे दर कमी झाल्याबद्दल गांधी यांनी सांगितले की, अमेरिकेत किरकोळ किमतीवर आधारित महागाई अपेक्षेपेक्षा मंद गतीने कमी होत आहे. यामुळे नजीकच्या भविष्यात अमेरिकेत व्याजदर कपातीची शक्यता नाही.
अशा परिस्थितीत व्याजदर उच्च पातळीवर राहणार आहेत. यामुळे गुंतवणूकदारांना डॉलर आणि अमेरिकेतील कर्जरोख्यामध्ये केलेल्या गुंतवणुकीवर जास्त परतावा मिळणार आहे. त्यामुळे सोने आणि चांदीबरोबरच शेअर बाजारातील गुंतवणूक अमेरिकेतील कर्जरोखे आणि डॉलरकडे वळत असल्यामुळे या दोन धातूचे दर कमी झाले. त्याचबरोबर जागतिक शेअर बाजाराचे निर्देशांक ही कमी झाले असल्याचे दिसून आले.
शेअर निर्देशांकात घट
जानेवारीत अमेरिकेतील किरकोळ महागाईचा दर काहीसा कमी होऊन 3.1% भरला आहे. तो 2.9% होण्याची विश्लेषकांना अपेक्षा होती. जोपर्यंत अमेरिकेतील महागाईचा दर दोन टक्क्यापेक्षा कमी होत नाही, तोपर्यंत फेडरल रिझव्हर्र् व्याजदरात कपात करणार नाही असे वातावरण आहे.
अशा परिस्थितीत हा महागाईचा दर दोन टक्क्यापर्यंत जाण्यास आणखी बराच कालावधी लागू शकतो असे जानेवारीच्या आकडेवारीवरून दिसून येते. त्यामुळे अमेरिकेतील शेअर बाजाराचे निर्देशांक एक टक्क्यांनी कोसळले. प्राप्त माहितीनुसार अमेरिकेतील डाऊ जोन्स 1.10 टक्क्यांनी एस अँड पी 500 निर्देशांक 1.33 टक्क्यांनी तर नॅसडॅक 1.90 टक्क्यांनी कोसळला.