Gold-Silver Rates: जागतिक स्तरावर मौल्यवान धातूंच्या किमतीत झालेल्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव 200 रुपयांनी घसरून 62,450 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. मागील ट्रेडिंग सत्रात सोन्याचा भाव 62,650 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता.
एचडीएफसी सिक्युरिटीजने दिलेल्या माहितीनुसार, “परदेशातील बाजारातील मंदीमुळे सोमवारी सोन्याचा भाव 200 रुपयांनी घसरला. मात्र, चांदी 75200 रुपये प्रति किलोवर स्थिर राहिली आहे.
अमेरिकन डॉलरच्या वाढीमुळे सोमवारी कॉमेक्सवर सोन्याच्या किमतीत घसरण झाली. जागतिक बाजारात सोने आणि चांदीचे भाव अनुक्रमे 1,995 डॉलर प्रति औंस आणि 23.06 डॉलर प्रति औंसवर घसरले.
गेल्या काही आठवड्यांपासून सोन्यात वाढ –
देशात सणांचा हंगाम सुरू आहे. अशा स्थितीत सोमवारी किंचित नरमाई आली असली तरी देशांतर्गत बाजारात सोन्या-चांदीच्या दरात चमक कायम आहे. जागतिक बाजारपेठेतही, गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर 2000 डॉलर प्रति औंसच्या आसपास आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासूनच सोन्याचे भाव वाढत आहेत. सध्या सलग तीन आठवडे सोन्याचे भाव वाढत आहेत.
सोन्याच्या किमतीत वाढ होण्याचे कारण काय ?
गेल्या वर्षी रशिया-युक्रेन युद्धामुळे सोन्याचे भाव वाढले होते. यंदा पश्चिम आशियातील संघर्ष आणि तणावामुळे गुंतवणूकदारांचा सोन्यावरील विश्वास पुन्हा वाढत आहे. गुंतवणूकदार सोन्यात पैसे गुंतवणे सुरक्षित मानतात. यामुळेच इस्रायल आणि हमास यांच्यातील वाढत्या संघर्षानंतर जगभरातील आर्थिक आघाडीवर अनिश्चिततेच्या वातावरणात लोक सोन्यात गुंतवणूक करत आहेत. परिणामी भाव वाढत आहेत.