नवी दिल्ली – गेल्या आठ महिन्यात सोन्याच्या दरात 10 हजार रुपयांची घट झाली आहे. त्यातल्या त्यात 1 फेब्रुवारीला भारताचा अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर सोन्याच्या दरात बरीच घट झाली होती. मात्र आज सोने आणि चांदीच्या दरात बरीच वाढ नोंदली गेली.
दिल्ली सराफात सोन्याचे दर 278 रुपयांनी वाढून 46,013 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. तर चांदीचा दर 265 रुपयांनी वाढून 68,587 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. याबाबत एचडीएफसी सिक्युरिटीजचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, जागतिक बाजारात सोन्याचे दर वाढल्यामुळे भारतात रुपयाचे मूल्य वाढूनही सोन्याचे दर मात्र वाढल्याचे दिसून आले.
वाढत असलेल्या करोनाचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता असल्यामुळे शेअर बाजाराचे निर्देशांक कोसळत आहेत. त्याचबरोबर सोन्यासह इतर कमोडिटीजकडे गुंतवणूक वळत असल्याचे पटेल यांनी सांगितले.
आता सोने 8 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आहे. आगामी काळात सोन्याचे दर कमी अधिक प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोन्याचे दर 50 हजार रुपयापेक्षा कमी पातळीवर असल्यानंतर दीर्घ पल्ल्याचा विचार करून खरेदी करणाऱ्यासाठी व्यवहार फायदेशीर राहील, असे बऱ्याच विश्लेषकांना वाटते.