नवी दिल्ली – जागतिक बाजारात बरेच गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीकडे वळत आहेत. त्यामुळे सोने आणि चांदीच्या दरत वाढ होत आहे. परिणामी भारतातही सोने आणि चांदीचे दर वाढत आहेत. आज सोन्याचा दर नव्या उच्चांकी पातळीवर गेला. ( Gold Silver Price)
दिल्ली सराफात सोन्याचा दर 850 रुपयांनी वाढून 70,000 रुपये प्रति दहा ग्रॅम या पातळीवर गेला. त्याचबरोबर तयार चांदीचा दर 1,000 रुपयांनी वाढून 81,700 रुपये प्रति किलो या ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर गेला. कालही देशात आणि परदेशात सोन्याच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती.
एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे वरिष्ठ विश्लेषक सौमील गांधी यांनी सांगितले की, जागतिक बाजारात सोन्याचे दर वाढत असल्यामुळे भारतीय बाजारातही सोन्याचे दर वाढत आहेत. जागतिक बाजारानुसार भारतातील सोन्याचे दर ठरतात. कारण भारतात सोन्याचे उत्पादन फार कमी प्रमाणात होत आहे.
स्पॉट मार्केट बरोबरच वायदे बाजारातही सोन्याचे दर वाढत आहे. त्यामुळे नजीकच्या भविष्यात सोन्याचे दर उच्च पातळीवर राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. जागतिक बाजारात सोन्याचा दर 2,297 डॉलर आणि चांदीचा दर 27.05 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी सांगितले की, एकूण परिस्थिती पाहता यावर्षी व्याजदरात कपात करणे आवश्यक ठरणार आहे.
यामुळे बर्याच गुंतवणूकदारांनी सोन्याची खरेदी केली असल्याचे सांगितले जाते. व्याजदरात कपात केल्यानंतर डॉलर आणि अमेरिकेच्या कर्जरोख्याऐवजी सोन्यातील गुंतवणुकीवर अधिक परतावा मिळण्याची शक्यता असते. त्यामुळे बरेच गुंतवणूकदार व्याजदर कपात झाल्यानंतर सोन्याची खरेदी करतात. अशा परिस्थितीत सोन्याचे दर वाढण्याचे शक्यता असते.
काही विश्लेषकांनी सांगितले की, रशिया – युक्रेन युद्ध सुरू आहे. त्याचबरोबर मध्यपूर्वेत तणाव वाढला आहे. अशा परिस्थितीत खनिज तेलाचे दरही वाढत आहेत. दरम्यानच्या काळामध्ये औद्योगिक दृष्टया महत्त्वाच्या तैवानमध्ये मोठा भूकंप घडला आहे. यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीकडे सध्या तरी वळत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे