नवी दिल्ली – गेल्या आठवड्यात मनुफॅक्चरिंग क्षेत्राची उत्पादकता विक्रमी पातळीवर वाढली असल्याची आकडेवारी जाहीर झाली असतानाच गुरुवारी सेवा क्षेत्राची उत्पादकता वाढून साडेतेरा वर्षाच्या उच्चांकी पातळीवर गेल्याची आकडेवारी समोर आली आहे. (Services sector PMI at 13-year high)
सेवाक्षेत्राचा परचेसिंग मॅनेजर इंडेक्स म्हणजे पी एम आय मार्च महिन्यामध्ये 61.2 इतका मोजला गेला आहे. फेब्रुवारी महिन्यात हा निर्देशांक 60.6 इतका मोजला गेला होता. हा निर्देशांक 50 अंकाच्या वर असल्यानंतर हे क्षेत्र विस्तारत असल्याचे समजले जाते. सध्या हा निर्देशांक साडेतेरा वर्षाच्या उच्चांकी पातळीवर आहे.
त्यामुळे या क्षेत्रात समाधान व्यक्त करण्यात येत आहे. हा निर्देशांक तयार करणार्या संस्थेने सांगितले की, सेवा क्षेत्रातील घडामोडी वेगाने वाढत आहेत. देशांतर्गत मागणीबरोबरच परदेशातील मागणीही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचारी भरती होण्याची शक्यता वाढली आहे.
जून महिन्यानंतर जर रिझर्व बँकेने व्याजदरात कपात केली तर सेवा क्षेत्रातील घडामोडी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येऊ लागली आहे. भारतीय राष्ट्रीय उत्पन्नात कृषी क्षेत्र आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रापेक्षा सेवा क्षेत्राचे योगदान जास्त असते. त्यामुळे सेवा क्षेत्राची उत्पादकता वाढल्यानंतर भारताचे राष्ट्रीय उत्पन्न अधिक वेगाने वाढण्यास मदत होते.
या क्षेत्रातून निर्यात वाढत आहे. आफ्रिका, आशिया खंडातील देश, आस्ट्रेलिया, युरोप खंडातील देश, अमेरिका आणि मध्यपूर्वेतील देशातून भारतातील सेवा क्षेत्राकडे मोठ्या प्रमाणात ऑर्डर येत आहेत. या ऑर्डर पूर्ण करण्यासाठी या कंपन्या प्रयत्न करणार असल्यामुळे आगामी काळात या क्षेत्राची उत्पादकता उच्च पातळीवर राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
संयुक्त निर्देशांकात वाढ
दरम्यान मार्च महिन्यासाठीचा मॅन्युफॅक्चरिंग आणि सेवा क्षेत्राचा संयुक्त निर्देशांक 61.8 इतका नोंदला गेला आहे. फेब्रुवारी महिन्यात हा निर्देशांक 60.6 इतका मोजला गेला होता. हा निर्देशांक 50 अंकाच्या वर असल्यामुळे आता नजीकच्या भविष्यामध्ये भारतात या क्षेत्रात नकारात्मक वातावरण सहजासहजी निर्माण होणार नसल्याचे समजले जात आहे. व्याजदर जास्त असूनही या सर्व क्षेत्रातील घडामोडी वाढल्या आहेत. आता व्याजदर कमी झाल्यानंतर या घडामोडी आणखी वाढू शकतात.