नवी दिल्ली – भारतासह जागतिक पातळीवर महागाईचा भस्मासुर वाढला आहे. युध्दामुळे जागतिक परिस्थितीत कमालीची अनिश्चितता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये गुंतवणूकदार सोने आणि चांदीचा आश्रय घेत असल्यामुळे सोमवारी भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात भरीव वाढ नोंदली गेली. सोन्याचा दर 542 रुपयांनी वाढून 53,461 रुपये प्रति 10 ग्रॅम या पातळीवर गेला.
त्याचबरोबर तयार चांदीचा दर 993 रुपयांनी वाढून 69,932 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला. सध्याच्या परिस्थितीमध्ये सोने खरेदी करण्याची शिफारस जागतिक पातळीवरील ज्येष्ठ गुंतवणूकदार करीत असल्यामुळे आता सोने आणि चांदी खरेदीकडे गुंतवणूकदारांनी मोर्चा वळविला असल्याचे वातावरण निर्माण झाले आहे. याच कारणामुळे जागतिक पातळीवर सोन्याच्या किमती वाढून 1,993 डॉलर व चांदीच्या किमती वाढून 25.88 डॉलर प्रति औंस या पातळीवर गल्या आहेत.
या परिस्थितीचे विश्लेषण करताना एचडीएफसी सिक्युरिटी संस्थेचे विश्लेषक दिलीप परमार यांनी सांगितले की महागाई आणि युद्धामुळे होणाऱ्या परिणामापासून बचाव करण्यासाठी गुंतवणूकदार सोने व चांदीची खरेदी करीत आहेत. अमेरिकेने अगोदरच पाव टक्के व्याजदर वाढ केली आहे. आगामी काळात अमेरिका आणखी व्याजदरात वाढ करणार आहेत. त्यामुळे सोने आणि चांदीच्या किमती लघु ते मध्यम पल्ल्यात वाढतील असे त्यानी स्पष्ट केले.