नवी दिल्ली – इतर चलनाच्या तुलनेत अमेरिकेचा डॉलर कमकुवत झाल्यामुळे जागतिक बाजारात सोन्याचे दर वाढले. भारतीय सराफातही सोने आणि चांदीच्या दरात भरीव वाढ नोंदली गेली. दिल्ली सराफात सोन्याचा दर तब्बल 506 रुपयांनी वाढून 55,940 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर 1,374 रुपयांनी वाढून 71,224 रुपये प्रति किलो झाला.
जागतिक बाजारात सोन्याचा दर वाढून 1,843 डॉलर व चांदीचा दर 24.37 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला होता. या संदर्भात बोलताना मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस या संस्थेचे उपाध्यक्ष नवनीत दमाने यांनी सांगितले की, सध्याच्या अस्थिर परिस्थितीत सोन्यात गुंतवणूक करावी असे बऱ्याच गुंतवणूकदारांना वाटत आहे.
त्यातच डॉलर कमकुवत होत आहे. अमेरिकेच्या कर्जरोख्यावरील परतावा कमी होत आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात वाढ होत आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या पतधोरण समितीचे इतिवृत्त बुधवारी जाहीर होणार आहे. त्यात अमेरिका व्याजदरात किती वाढ करेल याबद्दल भाष्य होण्याची शक्यता आहे. त्याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे गुरुवारी सोने आणि चांदी बाजाराला काही प्रमाणात दिशा मिळण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.