जेजुरी/जवळार्जुन -महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या खंडेरायाची रंगपंचमी मोजक्याच मानकरी, पुजारी वर्गांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि. 2)सकाळी साजरी करण्यात आली. या उत्साहात पहाटेची पूजा आरती झाल्यानंतर मुख्य गाभारा, भैरवनाथ मूर्तींसह उत्सवमूर्ती व स्वयंभू लिंगाला नैसर्गिक रंग लावण्यात आला. त्यामुळे अवघा रंग एकची झाला रंगी रंगला मल्हार, सदैव पिवळ्या भंडाऱ्यामध्ये न्हालेल्या मल्हारी मार्तंडाचे रंगपंचमीच्या दिवशीचे रूप मनमोहक दिसत होते.
सोन्यासारख्या पिवळ्या दिसणाऱ्या भंडाऱ्यामध्ये कायमस्वरूपी न्हालेल्या कुलस्वामी खंडेरायावर आज सप्तरंगी रंगाची उधळण करण्यात आली. पहाटे ब्राम्हमुहूर्तावर मंदिराचा द्वार उघडले ते सदानंदाचा येळकोटच्या गजरामध्येच, पहाटेच्या तोंडधुनीच्या महापूजेची लगबग सुरू असतानाच पुजारी, नित्य वारकरी सेवेकरींची लगबग सुरू झाली ती मंदिराचे गर्भगृह विविध रंगांनी रंगवण्यासाठी.
मंजुळ भूपाळीच्या स्वरात देवाला पंचामृत स्नान, तसेच मेघमल्हार डेअरीच्या वतीने श्रींना पंचरंगी श्रीखंड स्नान घालण्यात आले. त्यानंतर सर्वानी श्री मल्हारी मार्तंडावर रंगांची उधळण केली. आशा खुडे यांनी मध्यगर्भगृहामध्ये श्री मार्तंडाची पोट्रेट रांगोळी काढली.
वसंत ऋतूच्या आगमनाची चाहूल देणाऱ्या या सणांमध्ये निसर्ग विविधरंरंगी फुले आणि पालवीच्या माध्यमातून रंगीबेरंगी उधळण करीत असतो. अशा वातावरणात एकरूप होण्यासाठी रंगपंचमीचा सण साजरा करण्याची आपली परंपरा आहे म्हणूनच श्री मल्हारी मार्तंडाला विविध सुगंधित रंगांनी रंगवून हा मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.
यावेळी पुजारी नितीन बारभाई, चेतन सातभाई, अण्णाश्री उपाध्ये, जालिंदर खोमणे, सोमनाथ उबाळे, कृष्णा कुदळे, रियाज पानसरे, सिद्धेश आगलावे, महेश बारभाई, पुजारी, सेवक, देवस्थान कर्मचारी, नित्य वारकरी आणि मेघमल्हार प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते.