नवी दिल्ली : मध्य प्रदेशच्या शिक्षण मंत्र्यांचे नाव सध्या चर्चेत असल्याचे दिसत आहे. कारण शाळांकडून अतिरिक्त शुल्क आकारले जात असल्याची तक्रार करण्यासाठी गेलेल्या पालक संघटनेला शाळा शिक्षणमंत्री इंदर सिंग परमार यांनी धक्कादायक उत्तर दिले आहे. त्यांच्या उत्तरामुळे सध्या ते वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जर शिक्षण विभाग आमचे म्हणणे ऐकून घेणार नसेल तर काय करावे असा प्रश्न पालकांनी विचारला असता मध्यप्रदेशचे शिक्षणमंत्री इंदर सिंग यांनी चक्क पालकांना “जाऊन मरा” असे उत्तर दिले. यामुळे पालकांनी संताप व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्ष काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्याकडे जर इंदर सिंग परमार यांनी स्वत: राजीनामा दिला नाही तर त्यांनी मंत्रीमंडळातून बाहेर काढण्याची मागणी केली आहे.
मध्य प्रदेश पालक महासंघाच्या नेतृत्वात काही पालक इंदर सिंग परमार यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. यावेळी पालकांनी उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही शाळा जास्त फी घेत असल्याची तक्रार केली. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने करोना महामारीदरम्यान शाळांना अतिरिक्त फी घेऊ नये असा आदेश दिला आहे.
पालकांनी यावेळी इंदर सिंग परमार यांना मध्यस्थी करत फी कमी करण्यासाठी मदतीची विनंती केली. करोना संकटामुळे सध्या दैनंदिन खर्च भागवताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. शाळा शिक्षण विभागच आपलं ऐकून घेत नसेल तर काय करावं असं यावेळी पालकांनी विचारलं असता चिडलेल्या इंदर सिंग परमार यांनी, “जा आणि मरा…तुमची जी इच्छा आहे ते करा,” असे धक्कादायक उत्तर दिले.
पालक महासंघाचे अध्यक्ष कमल विश्वकर्मा यांनी यावेळी इंदर सिंग परमार यांनी पालकांची माफी मागितली पाहिजे तसेच गाऱ्हाणं ऐकण्याची इच्छा नसेल तर राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. दुसरीकडे काँग्रेसचे प्रवक्ते नरेंद्र सलुजा यांनीदेखील टीका केली असून इंदर सिंग परमार यांना निर्लज्ज म्हटले आहे. त्यांची तात्काळ हकालपट्टी केली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे.