नवी दिल्ली – भूतकाळ किंवा भविष्यकाळ सांगणारे जादूचे आरसे फक्त परिकथांमध्येच सापडतात. सिंड्रेलासारख्या कथांमध्ये अशा जादूच्या आरशांचे उल्लेख आढळतात;पण आता अशाच प्रकारचा जादूचा आरसा देण्याचे आमिष दाखवून उत्तर प्रदेश मधील एका व्यक्तीची भामट्यानी तब्बल नऊ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. उत्तर प्रदेशातील या 72 वर्षीय व्यक्तीला अशा प्रकारचा आरसा हवा होता, ज्या माध्यमातून तो इतर व्यक्तींना विवस्त्र अवस्थेत बघू शकेल अविनाश कुमार शुक्ला असे या व्यक्तीचे नाव आहे.
पश्चिम बंगालमधील तीन भामट्यांनी अशा प्रकारचा आरसा देण्याचे आमिष दाखवून त्याच्याकडून तब्बल नऊ लाख रुपये उकळले. अविनाश कुमारला आपल्या काही मित्रांच्या माध्यमातून अशा प्रकारच्या आरशाची माहिती कळली आणि त्यानंतर तो या तीन भामट्यांच्या संपर्कात आला. आपण एका सिंगापूर मधील मोठ्या कंपनीचे एजंट असून ही कंपनी अशा प्रकारचे जादूचे आरसे तयार करते अशी माहिती या तिघांनी अविनाश कुमारला दिली. असे आरसे सध्या अमेरिकेतील नासा ही संस्था वापरत असून या आरशाची किंमत तब्बल दोन कोटी रुपये आहे अशी माहिती या भामट्यांनी अविनाश कुमारला दिली.
अशा प्रकारच्या जादूच्या वस्तू खरेदी करून फायदा झालेल्या काही व्यक्तींची गाठही या भामट्यांनी अविनाश कुमारशी घालून दिली. अविनाश कुमारने या भामट्यांना नऊ लाख रुपये ऍडव्हान्स दिला. व्यवहार पूर्ण करण्यासाठी भामट्यांनी अविनाश कुमारला भुवनेश्वर येथे बोलावले पण तेथे एका हॉटेलमध्ये गेल्यावर अविनाश कुमारला यामध्ये काहीतरी गडबड असल्याचे जाणवले आणि त्याने पोलिसांना कल्पना दिली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करून या भामट्यांना अटक केले.