पुणे -खडकवासला धरण जवळपास भरले आहे. त्यामुळे विसर्ग सुरू झाला असून, मुठा उजवा कालव्यात 900 क्यूसेक, तसेच नदीतून रात्री उशिरा 3,424 क्यूसेक विसर्ग करण्यास सुरुवात करण्यात आली. त्यामुळे आठवड्यातून एक दिवस सुरू असलेली पाणीकपात रद्द करण्यात यावी, अशी मागणी राजकीय पक्षांनी केली आहे.
याबाबत मनपा आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे निवेदने आली आहेत. यात सजग नागरिक मंचासह, शिवसेना, मनसे तसेच रिपाइंने पत्र पाठवले आहे. हे विसर्ग करण्यात येणारे पाणी पुणेकरांना देणे शक्य आहे, असे या संस्था-पक्षांनी म्हटले आहे. यंदा पाऊस कमी व उशीरा पडेल असे गृहीत धरून पुण्यामध्ये दोन महिन्यांपासून आठवड्यातून एक दिवस गुरुवारी) पाणीकपात सुरू आहे.
तर, सध्या पावसामुळे खडकवासला धरण जवळपास भरले आहे. त्यामुळे विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणात पाणी साठवायला जागा नसल्याने धरणातून पाणी सोडावे लागत आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेता पाणीकपात रद्द करणे शक्य असून महापालिकेने याबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. शिवसेनेने (उद्धव ठाकरे) माजी नगरसेवक विशाल धनावडे, अशोक हरणावळ, संजय भोसले, अविनाश साळवे यांनी पाणीकपात मागे घेण्याची मागणी केली आहे.
सध्या पावसामुळे सर्व धरणे भरत असल्याने पाणी नदीत सोडण्याऐवजी ते शहराला द्यावे. शहरात सध्या सुरू असलेली पाणीकपात मागे घ्यावी, अशी मागणी आम्ही करत आहोत.- साईनाथ बाबर, शहराध्यक्ष, मनसे.
पंधरा दिवसांच्या पावसाने धरणे 60 टक्के भरली. पुढील दोन महिने पाऊस होणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. त्यामुळे पाणीकपात मागे घ्यावी. – डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी उपमहापौर, रिपाइं