टॅंकर मंजुरीचे अधिकार प्रांतांना द्या -अंकुश राक्षे

राजगुरुनगर (प्रतिनिधी) – खेड तालुक्यातील चार गावातील 7 वाड्यावस्त्यांना पाणी टंचाई सुरू झाली असून पाणी टंचाई दूर करण्यासाठी व टॅंकर सुरू करण्याची मागणी टंचाई ग्रस्त ग्रामस्थांनी केली असून खेड पंचायत समितीकडे या मागणीचे प्रस्ताव पाठवूनही टॅंकर सुरु करण्यात न आल्याने नागरिकांची पायपीट सुरू झाली आहे. दरम्यान टॅंकर मंजुरीचे अधिकार उपविभागीय अधिकारी (प्रांत) यांना प्रदान करण्याची मागणी पुण्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडे खेड पंचायत समितीचे सभापती अंकुश राक्षे यांनी केली आहे.

खेड तालुका करोना विषाणूच्या भीतीखाली वावरत असताना आता पाणी टंचाईचे संकट समोर आले आहे. त्यावर मात त करण्यासाठी खेड प्रशासन सज्ज असले तरी प्रस्ताव जिल्हाधिकारी मंजूर करीत असल्याने त्यास मोठा विलंब होतो. यावेळी जिल्ह्यावर करोनाचे संकट आहे.यावर्षी तालुक्यातील चार गावातील प्रस्ताव खेड पंचायत समितीचकडे दाखल झाले आहेत. मात्र मंजुरीसाठी आता ते पुणे येथे पाठविणे अधिक अवघड झाले आहे.

पुणे पिंपरी चिंचवड महानगर पालिका अंतर्गत येणारे सर्व कार्यक्षेत्र सील केले असल्याने पुणे येथे प्रस्ताव बायहॅन्ड मंजुरीसाठी नेण्यासाठी अडचणी येत आहेत. तालुक्यात चार गावांच्या वाड्यावस्त्या पाणी टंचाईच्या संकटात आहेत. एकीकडे करोना विषाणूचा प्रहार तर दुसरीकडे पाणी टंचाईचे संकट यातून मार्ग काढण्यासाठी प्रशासनाने महत्वाची भूमिका घेणे आवश्यक बनले आहे.

खेड तालुक्यात वाशेरे गावाच्या चार वाड्या, दोंदे गावाची ठाकरवाडी, वरुडे, वडगाव तर्फे खेड येथील वाड्यावस्त्यांमध्ये पाणी टंचाई सुरु झाली आहे. याबाबतचे टॅंकर मागणी प्रस्ताव खेड पंचायत समितीकडे आले आहेत. ते मंजुरीसाठी तहसिलदार, प्रांत अधिकारी यांचेकडे पाठविण्यात आले आहेत. टॅंकर मागणीचा प्रस्ताव त्यांच्याकडून जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात येत असल्याने त्यात विलंब होत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.