मुंबई – प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केली. कर्जतमधील एन.डी स्टुडीओमध्ये गळफास घेत देसाई यांनी आपलं आयुष्य संपवलं. देसाईंच्या आत्महत्येने हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक ऑडियो क्लिप रेकॉर्ड केल्याची माहिती समोर आली होती. आता त्यात त्यांनी काय म्हटले आहे याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
नितीन देसाई यांनी केलेल्या व्हॉईस रेकॉर्डरमध्ये 11 ऑडिओ क्लिप्स रेकॉर्ड केल्या असल्याची माहिती एका वृत्तवाहिनीने दिली आहे. वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, ‘लालबागच्या राजाला माझा अखेरचा नमस्कार’ हे रेकॉर्ड केलेले पहिलं वाक्य आहे. तसेच एन.डी.स्टुडिओ कोणत्याही बँकेच्या ताब्यात जाऊ देऊ नका, असे आवाहन देसाईंनी या ऑडिओ क्लिपमधून राज्य शासनाला केलं आहे.
यात राज्य शासनाने या एनडी स्टुडिओचा ताबा घेऊन कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी एक भव्य कलामंच उभारावं अशी माझी इच्छा आहे, मराठी, हिंदी कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनानं पुढाकार घ्यावा, कारण एन.डी.स्टुडिओ हे नितिन देसाई म्हणून नाही तर एका मराठी माणसाने उभं केलेलं मोठं कलामंच आहे असे देसाईंनी या क्लिपमध्ये म्हटले आहे.
यावरून, आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी एक मोठी मागणी केली आहे. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. राऊत म्हणाले की, “नितीन देसाईंसारखा कला दिग्दर्शक हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीत स्वतःच्या कर्तृत्वावर हिंमतीने उभा राहिला. या देशातील उत्तम असा कला स्टुडिओ एन. डी स्टुडिओ कर्जत येथे उभा केला.
त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती केली. अशा या महान कलाकाराचा मृत्यू झाला, त्याला मृत्यूला कवटाळावं लागलं. एन.डी स्टुडिओ नितीन देसाईंचं स्वप्न, मराठी माणसाचं स्वप्न होतं. महाराष्ट्रात तुम्ही नव्या चित्रनगरीची योजना आखत असाल तर कर्जतच्या स्टुडिओलाच चित्रनगरीचा दर्जा द्या..’ अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.