रेडा -राज्यातील नगरपालिकांना करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी, मोठा खर्च वाढत आहे. त्यामुळे अशा नगरपरिषदांना शासनाच्या माध्यमातून किमान 50 लाखांचे अनुदान देण्यात यावे, अशी मागणी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे भ्रमणध्वनीद्वारे केली आहे, या मागणीस नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
इंदापूर नगर परिषद कामकाज आढावा बैठक माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषदेच्या मुख्य कार्यालयात बुधवारी (दि. 20) पार पडली. यावेळी नगर परिषदेच्या अडचणी हर्षवर्धन पाटील यांनी जाणून घेतल्या व करोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगरपरिषदेचा खर्च वाढत आहे.
ही बाब मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांनी लक्षात आणून देताच, थेट माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद या मागणीला दिला आहे.
यावेळी नगराध्यक्षा अंकिता शहा, शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, इंदापूर अर्बन बॅंकेचे अध्यक्ष भरत शहा, उपनगराध्यक्ष धनंजय पाटील, गटनेते कैलास कदम यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.