मुंबई – महाराष्ट्रातून आता थेट विदेशामध्ये तूप निर्यात करण्यात येणार आहे. राज्यातील “महानंद घी’ हे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांच्या मार्गदर्शनाखाली आखाती देशामध्ये निर्यात करण्याचा आरंभ करण्यात आला.
महानंद दुग्धशाळेचे “घी’ दुबई, तसेच मध्य आशियाई या आखाती देशामध्ये निर्यात करण्यात येत आहे. ही बाब महाराष्ट्रासह महानंद दुग्धशाळा व दूध महासंघासाठी सुवर्ण मानबिंदू आहे. महानंद दुग्धशाळेचे घी आखाती देशामध्ये निर्यात करण्यासाठी मे. पोर्ट शिपींग अँड लॉजिस्टीक इंडीया लि. यांना प्राधिकृत निर्यातदार संस्था म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांच्या हस्ते, उपाध्यक्ष डी. के. पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमास दूरदृश्य प्रणालीद्वारे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर उपस्थित होत्या.
दरम्यान, महानंद दुग्धशाळेची स्थापना शेतकऱ्यांच्या हितासाठी झाली. दूध महासंघाचे 85 तालुका/जिल्हा सभासद असून दूध संघाचे सभासद सहकारी दूध उत्पादक संस्था आहेत. राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांशी दूध महासंघ जोडलेला आहे. महानंदच्या सर्व दुग्धपदार्थांचा दर्जा अत्यंत उत्तम असल्यामुळे ग्राहकांनी या दुग्धपदार्थाना नेहमीच पसंती दिलेली आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.