रेल्वे परीक्षा निकालाविरोधात बिहार बंदची हाक; उत्तर भारतात परीक्षार्थींचे आंदोलन

नवी दिल्ली,- आरआरबी-एनटीपीसी परीक्षेच्या निकालानंतर परीक्षार्थींमध्ये असंतोष असून त्यांनी बिहार बंदची हाक दिली आहे. या परीक्षेमध्ये निकाल आणि भरती प्रक्रियेमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत परीक्षार्थीं आक्रमक झाले असून अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे चित्र आहे. या घटनेची दखल पंतप्रधान कार्यालयाने घेतली असून रेल्वे भरती प्रक्रियेसंबंधी एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे.
या बैठकीसाठी पंतप्रधान कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि रेल्वे खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. सन 2004नंतर आतापर्यंत रेल्वे बोर्डामध्ये किती भरती झाली आहे. त्या वेळी भरती प्रक्रिया कशी होती या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.
रेल्वे बोर्डाच्या परीक्षा निकालाविरोधात आज बिहारमध्ये बंद पुकारण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या रेल रोको आंदोलनामुळे काही ठिकाणी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती आहे. आरआरबी-एनटीपीसीच्या परीक्षेचा निकाल 14-15 जानेवारी रोजी जाहीर झाला होता.
हा निकाल जाहीर झाल्यानंतर बिहार, उत्तर प्रदेशसह इतर ठिकाणी याविरोधात मोठे आंदोलन सुरू झाले आहे. विद्यार्थ्यांनी रेल रोको आंदोलनही सुरू केले आहे. रेल्वेने जाहीर केलेल्या निकालात घोळ झाला असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. ही परीक्षा एक कोटी 40 लाख विद्यार्थ्यांनी दिली होती.
दरम्यान, रेल्वे मंत्रालयाने आरआरबी-एनटीपीसी आणि रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाच्या श्रेणी-1ची भरती परीक्षेला स्थगिती दिली आहे. परीक्षार्थींच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. ही समिती रेल्वे मंत्रालयाला अहवाल सादर करणार आहे.




