लंडन – जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अदनाम घेब्रेयसिस यांची दुसऱ्यांदा फेरनियुक्ती होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. “डब्सूएचओ’च्या सदस्य देशांकडून त्यांच्या नियुक्तीला मान्यता देण्यात आली आहे. संघटनेच्या प्रमुखपदासाठी घेब्रेयसिस यांच्या उमेदवारीला अन्य कोणत्याही उमेदवाराने आव्हान दिलेले नाही. करोनाच्या साथीला अटकाव करण्याच्या आव्हानात्मक परिस्थितीमध्ये घेब्रेयसिस यांचीच या पदावरील नियुक्ती योग्य असल्याचे मत सदस्य देशांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केले आहे.
घेब्रेयसिस हे इथिओपियाचे माजी मंत्री आहेत. कोविड-19 च्या अतिशय आव्हानात्मक स्थितीमध्ये त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या व्यवस्थापनाचे महत्वपूर्ण आणि अवघड कार्य पार पाडले आहे. संघटनेने अनेक चुकीचे निर्णय घेतले अशी टीका होत असतानाही ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले होते.
घेब्रेयसिस हे आफ्रिकेतील देशातून निवडले गेलेले “डब्लूएचओ’चे पहिले महासंचालक आहेत. तसेच लौकिक अर्थाने स्वतः वैद्यकीय शिक्षण न घेतलेले आतापर्यंतचे पहिले महासंचालकही आहेत. करोना विषाणू चीनमधून पसरला असल्याबद्दल “डब्लूएचओ’कडून सुरू करण्यात आलेली तपासणी घेब्रेयसिस अध्यक्ष असतानाच रखडली होती. हा विषाणू चीनमधील प्रयोगशाळेतून पसरला नसल्याबाबतचा अहवाल सादर केल्यानंतर हा तपास थांबवण्यात आला होता. “डब्लूएचओ’ चीनला पाठिशी घालत आहे, अशी टीका अमेरिकेकडून वारंवार करण्यात आली होती.