खळबळजनक ! मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ आढळली स्फोटकांनी भरलेली जीप

मुंबई – भारतातील सर्वांत श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या येथील निवासस्थानाजवळ गुरूवारी स्फोटकांनी भरलेली जीप आढळली. त्या घटनेमुळे एकच सनसनाटी निर्माण होऊन सुरक्षा आणि तपास यंत्रणांची धांदल उडाली.

मुंबईतील पॉश एरियात अंबानी यांचे अँटिलिया नावाचे बहुमजली भव्य निवासस्थान आहे. अतिसुरक्षित असणाऱ्या त्या निवासस्थानापासून काही अंतरावर संशयास्पद स्कॉर्पियो जीप आढळली. त्या जीपसंदर्भात दुपारच्या सुमारास एक फोन आल्याने मुंबई पोलिसांच्या पथकाने तातडीने घटनास्थळ गाठले. त्यानंतर बॉम्बशोधक आणि श्‍वानपथकांनाही पाचारण करण्यात आले. जीपमध्ये जिलेटीनच्या 25 कांड्या आढळल्या, असे वृत्त काही वाहिन्यांनी दिले.

जीपमध्ये जिलेटीन कांड्यांसह एक चिठ्ठीही सापडली. त्यामध्ये घातपात घडवण्याची धमकी देण्यात आल्याचे समजते. मात्र, त्याचा तपशील समजू शकला नाही. संबंधित प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजची छाननी केली जात आहे.

स्फोटके ठेवण्यात आलेली जीप बुधवारची मध्यरात्र उलटल्यानंतर संबंधित ठिकाणी पार्क करण्यात आली. त्या जीपचा क्रमांक बनावट असल्याचे समजते. अंबानी यांच्या एका वाहनाचा आणि त्या जीपचा क्रमांक सारखाच आहे. त्यामुळे सस्पेन्स आणखीच वाढला आहे. संबंधित घटनेची गंभीर दखल सुरक्षा आणि तपास यंत्रणांनी घेतली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.