मुंबई – रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील 1982 सालच्या मोसमातील कर्नाटकविरुद्धच्या उपांत्य लढतीत विक्रमादित्य सुनील गावसकर यांनी चक्क डाव्या हाताने फलंदाजी करत मुंबईचा निर्णायक पराभव टाळला होता. त्याच आठवणींना जुन्या जाणत्या खेळाडूंनी सोशल मीडियावर उजाळा दिला.
कर्नाटक संघात रघुराम भट हा फिरकी गोलंदाज होता आणि त्याने त्या मोसमात आपला दबदबा प्रस्थापित केला होता. या सामन्यात मुंबईला निर्णायक पराभव टाळण्याचे आव्हान निर्माण झाले होते. त्यावेळी अखेरच्या दिवसाचा खेळ संपण्यास जवळपास एक तासापेक्षा जास्त वेळ होता. त्यावेळी जर मुख्य शैलीत उजव्या हाताने फलंदाजी केली तर आपण बाद होऊ असे वाटल्याने गावसकर यांनी भट याची गोलंदाजी खेळताना डाव्या हाताने फलंदाजी करण्याचा तर अन्य गोलंदाजांविरुद्ध नेहमीप्रमाणे उजव्या हाताने फलंदाजी करण्याचे ठरवले.
गावसकर दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी जेव्हा फलंदाजीला आले तेव्हा त्यांनी डाव्या हाताने फलंदाजी करणारा फलंदाज जसा पंचाकडे गार्ड मागतो तसे लेग गार्ड मागितले त्यावेळी कर्नाटकच्या खेळाडूंना समजतच नव्हते की गावसकर नक्की काय करत आहेत, पण त्यांनी डावा स्टान्स घेतला आणि भट याची गोलंदाजी भन्नाटपणे खेळून काढली.
जवळपास एक तास गावसकर यांनी डाव्या हाताने फलंदाजी केली व मुंबई संघाचा निर्णायक पराभव टाळला. या सामन्यात भट यांनी दोन्ही डावांत मिळून 13 गडी बाद केले होते त्यावरून त्यांची या सामन्यातील गोलंदाजी कीती भेदक होत होती ते लक्षात येते. सामन्याचा अखेरचा दिवस होता आणि फिरकी गोलंदाजांना खेळपट्टीकडून प्रचंड मदत मिळत होती म्हणूनच गावसकर यांनी डाव्या हाताने फलंदाजी करत नाबाद 18 धावा केल्या. दिवसाचा अखेरच्या षटकांचा वेळ खेळून काढत मुंबईचा निर्णायक पराभव टाळला.
खेळाडूंनी डोक्याला हात लावला…
जेव्हा गावसकर डाव्या हाताने फलंदाजी करत होते व भट यांच्यासारख्या भेदक गोलंदाजाचे चेंडू लिलया खेळून काढत होते त्यावेळी कर्नाटकच्या खेळाडूंना समजतच नव्हते की, जर गावसकर डाव्या हाताने फलंदाजी करत असतानाही आपण त्यांना बाद करू शकत नाही तर नेहमीप्रमाणे उजव्या हाताने फलंदाजी करताना ते तर महिनाभर बादच व्हायचे नाहीत. गावसकर यांच्या गुणवत्तेला कर्नाटकच्या खेळाडूंनी दाद तर दिलीच मात्र, आपल्या भेदक गोलंदाजांना आलेले अपयश पाहून डोक्याला हातही लावला.