गौतम गंभीर आणि ओमर अब्दुल्लांनी एकमेकांवर साधला निशाणा

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत विविध पक्षांचे नेते परस्परांवर शाब्दिक तोफा डागत आहेत. त्या शाब्दिक युद्धात उडी घेत माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर आणि जम्मू-काश्‍मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी एकमेकांवर निशाणा साधला आहे.

जम्मू-काश्‍मीरसाठी स्वतंत्र पंतप्रधान असावा, अशी भूमिका नुकतीच नॅशनल कॉन्फरन्सचे (एनसी) नेते असणाऱ्या ओमर यांनी मांडली. त्यावरून भाजपच्या नेत्यांनी ओमर यांच्यावर टीकेचे सत्र सुरू केले आहे. त्या आघाडीवर अलिकडेच भाजपमध्ये प्रवेश करणारा गंभीरही मागे राहिलेला नाही. ओमर यांना चांगल्या झोपेची आणि कडक कॉफीची गरज आहे. त्यानंतरही ते समंजसपणा दाखवणार नसतील तर त्यांनी पाकिस्तानला स्थलांतर करावे, अशी टिप्पणी गंभीरने ट्विटरवरून केली. त्यावरून ओमर यांनी लगेचच पलटवार केला. मी कधीच फारसे क्रिकेट खेळलो नाही. कारण, त्यात मला फारशी गती नसल्याची जाणीव आहे. तुला जम्मू-काश्‍मीर, त्या राज्याचा इतिहास, एनसीची भूमिका याबाबत फारशी माहिती नाही. तुला माहिती असलेल्या बाबींवरच तू बोलावे आणि ट्‌विट करायचे तर आयपीएलबाबत करावे, असे ओमर यांनी गंभीरला उद्देशून म्हटले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.